मुक्तपीठ टीम
शेतकरी जेवढी पावसाची वाट पाहतो तेवढी कदाचित चातकही वाट पाहत नसेल. पण हाच पाऊस जेव्हा धसमुसळेपणाने अंगात काही तरी संचारल्यासारखा कोसळतो तेव्हा होतं होत्याचं नव्हतं होतं. पुण्यातील आंबेगाव जुन्नर परिसरात मुसळधार पावसाच्या संततधारेने भूस्खलन झाले. त्यात ३० एकर भातशेती मातीच्या ढिगाऱ्यांखाली गाडली गेली. या आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. या आपत्तीची ही खास बातमी…
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह पुण्यात पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील आदीवासी भागात भूस्खलनानाने जवळपास २५ ते ३० एकर भातशेती वाहून गेली आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शेतकरी अशोक शेळके यांची संपूर्ण भात शेती मातीखाली गाडून गेली आहे,त्यामुळे अतिवृष्टीचा फटका सगळ्यात जास्त पश्चिम आदिवाशी पट्यात बसला आहे. महसूल विभागाने पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. आदिवासी भागात भात हे महत्त्वाचे पिक आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांची उपजीवीका भात शेतीवर अवलंबून असते. भूस्खलाने शेती वाहून गेल्याने आता वर्षभर खायचं काय असा प्रश्न या आदिवासी शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. राज्य सरकारने पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी
अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे शेतकरी संकटात आले आहेत. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची गरज आहे. तरी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून तळेरान येथील भूस्खलनामुळे भातशेती गाडली जाऊन झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.
गेल्या आठवडाभरापासून उत्तर पुणे जिल्ह्यात पावसाची धो धो पाऊस आहे. पावसाने भीमा नदीला आलेल्या पुरात शिरूर तालुक्यातील नागरगाव येथील एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला असून गुरूवारी सायंकाळी भिमा नदिवरती मासेमारी करत असताना लक्ष्मण जाधव हे पुराच्या पाण्यात वाहून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे.