मुक्तपीठ टीम
एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडेंची कोपरी पोलिसांनी आठ तास चौकशी केली. मद्य विक्रीच्या परवानासाठी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणी समीर वानखेडे यांचा ५ ते ६ पाणी जबाब कोपरी पोलिसांनी नोंदवला आहे. मात्र, केंद्रीय सेवेतील समीर वानखेडेंना राज्याच्या पोलिसांनी ज्या दिवशी चौकशीसाठी आरोपी म्हणून बोलवले तोच दिवस केंद्रीय यंत्रणा असणाऱ्या ईडीने नवाब मलिकांच्या अटकेसाठी निवडला. त्यामुळे सर्व माध्यमांचे लक्ष मलिकांवरच राहिलं. समीर वानखेडे आरोपी म्हणून पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर होताना मोठ्या प्रमाणावर मीडिया कव्हरेजपासून मात्र बचावले. अप्रत्यक्षरीत्या त्यासाठी नवाब मलिकांच्या अटकेमुळेच ते मीडियापासून दूर राहू शकले. तेवढं कव्हरेज झालं नाही.
वानखेडेंचा बार परवान्यासाठी वयाचा घोळ?
- समीर वानखेडे यांचे नवी मुंबई येथील वाशी भागात सद्गुरु बार आणि रेस्टॉरंट आहे.
- वानखेडे यांनी बारचा परवाना १९९७ मध्ये काढला होता.
- परंतु त्यावेळी वानखेडे यांचे वय १७ वर्ष होते.
- याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्यानंतर विभागाने त्यांच्याकडून खुलासा मागविला होता.
- काही दिवसांपूर्वीच याप्रकरणाची सुनावणी होऊन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश दिले होते.
- त्यानुसार त्यांचा बारचा परवाना रद्द करण्यात आला.
वानखेडेंविरोधात कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा
- उत्पादन शुल्क विभागाच्या तक्रारीनंतर वानखेडे यांच्याविरुद्ध १९ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- या प्रकरणी वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
- न्यायालयाने त्यांना हंगामी संरक्षण देत २८ फेब्रुवारीपर्यंत अटकेची कारवाई न करण्याविषयी निर्देश दिल्याने वानखेडे यांना दिलासा मिळाला आहे.
वानखेडेंना पुन्हा बोलवण्याची शक्यता
- कोपरी पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याविषयी वानखेडे यांना नोटीस पाठवली होती.
- त्यानुसार बुधवारी सकाळी ११.३० वाजता वानखेडे चौकशीसाठी कोपरी पोलिस ठाण्यात हजर झाले.
- अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी ७.३० वाजता वानखेडे पोलिस ठाण्यातून बाहेर पडले.
- वानखेडे यांचा पोलिसांनी जबाब नोंदवला असून हा जबाब पाच ते सहा पानांचा असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.
- वानखेडे यांना विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मुद्देसूद उत्तर दिली असून ते तपासाला सहकार्य करीत असल्याचे या पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
- आवश्यक वाटल्यास वानखेडे यांना परत पोलिसांकडून बोलवण्यात येणार आहे.