मुक्तपीठ टीम
श्रीक्षेत्र पुरीला जागतिक ऐतिहासिक शहर म्हणून विकसित करण्यासाठी ओरिसा सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, सरकारने कोणार्क क्षेत्राच्या विकासासाठी एक रोडमॅपही तयार केला आहे. कोणार्क परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्यासाठी योजना तयार केली गेली आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे कोणार्क सूर्य मंदिराची प्रतिष्ठा, पर्यटकांसाठी नवीन अनुभूती, स्थानिक व्यावसायिकांचा आर्थिक विकास आणि कोणार्कसह संपूर्ण जिल्हा आणि राज्यात पर्यटनाचा विकास हा आहे.
१९८४ मध्ये, युनेस्कोने कोणार्कला जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे. जगप्रसिद्ध कोणार्क सूर्यमंदिराच्या सुरक्षेसह त्याची देखभालीचा उद्देश आहे. अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकार त्यांच्या ५ टी कार्यक्रमांतर्गत हा प्रकल्प सुरू करणार आहे.
या प्रकल्पांतर्गत एंट्री पॉईंटवर पर्यटकांच्या स्वागतासाठी कोणार्क एन्ट्री प्लाझा बांधला जाणार आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी मल्टी मॉडेल हब बांधण्यात येणार आहे. त्याच प्रकारे कोणार्क मुक्ताकाश थिएटर अधिक आकर्षक बनविण्यात येणार आहे. परिसरातील सुशोभिकरणात पादचाऱ्यांसाठी एक खास रस्ता बनवला जाईल. कोणार्क योजनेमुळे स्थानिक लोकांच्या विकासासह वारसा जपला जाईल आणि जगभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र बनेल अशी माहिती उच्चस्तरीय समितीने मुख्यमंत्र्यांना दिली.
कोणार्कमध्ये विकासाचा नवा सूर्योदय
- भुवनेश्वर ते कोणार्क पर्यंत बनवण्यात येणार पॉईंट्स
- अशा परिस्थितीत, कोणार्क मंदिराच्या सभोवतालच्या क्षेत्राचा विकास करण्याबरोबरच या विकासातील प्राचीन वारसा समायोजित करण्यावर भर देण्यात आला आहे.
- साडेतीन किलोमीटरचा बाहेरील रिंग रोडला सहा लेन बनवल्या जातील
- मंदिराकडे जाणारा सर्व मार्ग विकसित केला जाईल
- प्रवाशांना आणण्यासाठी भुवनेश्वर ते कोणार्क पर्यंत पॉईंट बनविण्यात येतील. मंदिरासमोरील ३० एकर जमीन पूर्णपणे मोकळी ठेवण्याबरोबरच लँडस्केपिंग देखील केले जाईल
एक वेगळी बाब म्हणजे, सरकारच्या या विकास योजनेबद्दल स्थानिकांचे मतदानही घेण्यात येणार आहे. त्यानंतर विकासकार्याचा अंतिम निर्णय़ घेतला जाईल.