मुक्तपीठ टीम
ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व यश मिळालं आहे. बंगालमध्ये त्यांच्या तृणमूल काँग्रेसला मुस्लिम मतदारांची मते एकगठ्ठा मिळाली आहेत. त्यांना नेहमी मिळतात त्यापेक्षा जास्तच मते यावेळी मिळाली आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते या निवडणुकीत भाजपाने आक्रमक हिंदू कार्ड खेळून ध्रुविकरणाचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्यावरच उलटला. कारण बंगाली हिंदूंनी बंगाली म्हणून प्रादेशिक पक्षाला मतदान केले आणि भयग्रस्त झालेले मुसलमान मतदारही पूर्णपणे तृणमूलसोबत उभे राहिले.
तृणमूल काँग्रेसला मिळणाऱ्या मतांमध्ये एक भाग भाग हा मुस्लिम मतदारांचा असतो. त्यांना तोडण्यासाठी यावेळी बंगालच्या लढाईत एमआयएम आणि सेक्युलर फ्रंट हे दोन पक्ष उतरले होते. बिहारमध्ये पाच जागा जिंकल्यानंतर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे पश्चिम बंगालमध्येही तसेच विजयी होण्याचे स्वप्न होते. परंतु या निवडणुकीच्या निकालानंतर ओवेसीची स्वप्ने धुळीत मिळाली आहेत. तसेच तृणमूल कॉंग्रेसची मुस्लिम मते हिरावून घेईल असे मानल्या गेलेल्या अब्बास सिद्दीकी यांच्या आयएसएफसारख्या पक्षालाही दारूण पराभवाचा सामना करावा लागला.
या निवडणुकीत ओवेसी यांनी आपल्या एमआयएमतर्फे सात उमेदवार उभे केले होते. पण त्या सातही जणांच्या अनामत रकमा जप्त झाल्या आहेत. ओवेसी यांनी ज्या सात जागांवर उमेदवार उभे केले आहेत त्यात इथार मधून मोफाकर इस्लाम, जालंगी जागेवर सोरेकत जमान, सागरडीघी मधून नूर महबूब आलम, भरतपूरमधून सज्जाद हुसेन, मालतीपूर येथे मौलाना मोतीहर रहमान, रतुआ मधून सैदूर रहमान आणि अंशानसोल उत्तर यांचा समावेश होता. डॅनिश अजीज यांना निवडणूकीच्या मैदानात उतरवले होते. इंडियन सेक्युलर फ्रंटने तर डावे पक्ष आणि कॉंग्रेसशी युती केली होती. त्यांनी २६ जागांवर निवडणूक लढविली होती. पण त्यांनाही मुस्लिम मतदारांनी फार थारा दिला नाही.
ओवेसींना तृणमूलची मुस्लिम मते फोडण्यात अपयश
- ओवेसींनी बिहारप्रमाणेच मुसलमान मतदारांवर लक्ष केंद्रीत केले.
- पण बंगालमधील मुसलमान मतदारांची मनं जिंकणे त्यांना शक्य झाले नाही.
- मुस्लिम मतदारांची मते मिळवण्यासाठी ओवेसी यांनी सातही जागांवर मुस्लिम उमेदवार उभे केले होते, परंतु ओवेसींना बंगालमधील मुस्लिम मतदारांनी थारा दिला नाही.
- ओवेसींच्या उमेदवारांना एक हजार मते सुद्धा मिळाली नाहीत
- इटहार मतदारसंघात ५२ टक्के मुस्लिम मतदार आहेत, जिथे एमआयएमच्या मोफक्कर इस्लाम यांना एक हजारही मते मिळाली नाहीत.
- सागरडीघी मतदारसंघात ६५ टक्के मुस्लिम मतदार आहेत, तेथे नोरे मेहबूब आलम यांना पाचशे मतेही मिळाली नाहीत.
- मालतीपूर मतदारसंघात ३७ टक्के मुस्लिम मतदार तेथेही एमआयएमचे उमेदवार मौलाना मेतिहर रहमाननी अमानत रक्कमही गमावली.
- जालंगी मतदारसंघात ७३ टक्के मुस्लिम मतदार आहेत. परंतु ओवेसींच्या पक्षाचे उमेदवार शौकत जमान हेदेखील पराभूत झाले.
- राहुता मतदारसंघात जवळपास ४१ टक्के मुस्लिम मतदार आहेत, जिथे एमआयएमचे उमेदवार सैदूर रहमान यांना ५०० मते मिळू शकली नाहीत.
- डॅनिश रझा यांनीही आसनसोल उत्तर जागेवर अमानत गमावली, तेथे २० टक्के मुस्लिम मतदार आहेत.
- भरतपूरमध्ये ५८ टक्के मुस्लिम मतदार असूनही एमआयएमचे उमेदवार सज्जाद हुसेन यांचा पराभव झाला.
- एमआयएमला केवळ ०.०२ टक्के मते मिळाली.