मुक्तपीठ टीम
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारनंतर पावसाला जोर धरल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूरला अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारी म्हणून एनडीआरएफचं पथक कोल्हापुरात दाखल झालं आहे. मात्र दोन दिवसांपासून पावसाचा जोर किंचीत कमी झाला आहे. इशारा पातळीकडे जाणारे पंचगंगा नदीचे पाणी कमी होत आहे. यामुळे रेड अलर्टनंतर आता पुढील तीन दिवस कोल्हापूरला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री पंचगंगा नदी पातळी ३२.५ वर पोहचली. इशारा पातळी ३९ असल्याने त्या दिशेने पाणी वाढत होते. पण गुरुवार पासूनच पाऊस कमी झाला. पंचगंगेसह बहुतांशी सर्वच नद्यांचे पाणी अजूनही पात्राबाहेरच असून, शिरोळ , तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘एनडीआरएफ’ची पथके अजूनही तैनात करण्यात आली आहेत . अजूनही २७ बंधारे पाण्याखाली राहिले आहेत.
राज्यातील मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ८ ते १२ जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभगानं वर्तवली आहे. तसेच रायगड आणि सिंधुदुर्गमध्येही चांगला पाऊस सुरु आहे. या पावसामुळं वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील ढगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे.