उदयराज वडामकर / कोल्हापूर
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात अखेर महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांचा दणदणीत विजय झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. एकप्रकारे त्यांना मिळालेला विजय हा त्यांचे पती आणि दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव उर्फ अण्णा यांना कोल्हापूरकर मतदारांनी वाहिलेली मतांजली मानली जात आहे. सतेज पाटलांची समन्वयाची रणनीती या निवडणुकीत यशस्वी ठरल्याचं मानलं जातं. जागा काँग्रेसला सोडल्यानं नाराज असलेल्या स्थानिक शिवसैनिकांनीही नंतर प्रचारात झोकून दिल्यानं या पोटनिवडणुकीत आघाडीची एकीही जिंकल्याचं मानलं जातं.
दिवंगत आमदार चंद्रकांत जाधवांना मतांजली!
- काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी कोरोना संकटातही लोकसेवा सुरु ठेवली होती.
- त्यांचे कोरोनानेच निधन झाले.
- त्यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा प्रयत्न झाला. पण भाजपाने नकार दिला.
- त्यामुळे झालेल्या निवडणुकीत कोल्हापूरकर मतदारांची सहानुभूती दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांच्याकडे होती.
- एकप्रकारे कोल्हापूरकर मतदारांनी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना मतांजली वाहिल्याचे मानले जाते.
सतेज पाटील यांची रणनीती!
- राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापुरातील निवडणुकीची सुत्रे हाताळली.
- आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रिफ, शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यासर्वांन सोबत घेत त्यांनी समन्वय साधला.
- अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ऑनलाइन भाषण झाले.
- कुणालारही न दुखावता सोबत घेत लढण्याची सतेज पाटील यांची समन्वयाची रणनीतीच यशस्वी ठरल्याचं दिसून आले.
आघाडीची एकी जिंकली!
कोल्हापूर उत्तर मतदार संघात झालेल्या पोटनिवडणुकीत ३५८ मतदान यंत्रातील मोजणीकडे महाराष्ट्राचंच नाही तर देशाची राजधानी दिल्लीतूनही भाजपा पक्षश्रेष्ठींचं लक्ष लागलं होतं. शिवसेनेतील अस्वस्थतेचा फायदा उचलता येत नसल्याचं लक्षात आल्यानंतर भाजपाने शेवटच्या टप्प्यात आक्रमकतेनं हिंदुत्वाचा मुद्दा आणला. राज्यातही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलन छेडल्यानं वातावरण तापत होते. त्यामुळे ही निवडणूक कमालीची चुरशीची झाली होती. पण काँग्रेसच्या जोडीनेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अखेरच्या टप्प्यात जोर लावला. पण अखेर आघाडी एकदिलानं लढली आणि विजयी झाली.