मुक्तपीठ टीम
भविष्य निर्वाह निधी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी बातमी आहे. भारतातील पगारदार व्यक्तींसाठी ही सर्वात फायदेशीर आणि लोकप्रिय गुंतवणूक आहे. भविष्य निर्वाह निधी संघटना ही भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली वैधानिक संस्था आहे. या योजनांतर्गत नियमित गुंतवणूक केली जाते. या गुंतवणुकीतून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मोठी रक्कम मिळते. परंतु, भविष्य निर्वाह निधी योजना ही केवळ एकच नसून तिचे आणखी प्रकार आहेत.
भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन आणि विमा यासंबंधीचे फायदे याद्वारे मिळातात. या योजनेचे ३ प्रकार आहेत. पहिला म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफ, दुसरा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ आणि तिसरा सामान्य भविष्य निर्वाह निधी म्हणजेच जीपीएफ यांचा समावेश होतो.
भविष्य निर्वाह निधी योजनेतील ‘या’ ३ योजनांविषयी सविस्तर माहिती
१. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ)
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ही एक सरकारी संस्था आहे जी भारतामध्ये राज्य-प्रोत्साहित पेन्शन आणि विमा योजना प्रदान करते.
- सदस्य आणि आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात ही जगातील सर्वात मोठी संस्था आहे.
- ईपीएफ ही सरकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त पगारदार लोकांसाठी भविष्य निर्वाह निधी योजना आहे.
- ईपीएफओच्या सध्याच्या नियमांनुसार, कर्मचारी दरमहा मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या १२ टक्के योगदान देतो. ही रक्कम त्यांच्या पगारातून दरमहा कापली जाते.
- तसेच तो ज्या संस्थेत काम करतो. ती तेवढीच रक्कम कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यातही जमा करते.
२. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)
- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा करमुक्त बचत मार्ग आहे. ज्याला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे.
- भारतीयांमध्ये बचतीची सवय लावण्यासाठी आणि खासगी क्षेत्रात काम करणार्या लोकांना सेवानिवृत्ती सुरक्षा प्रदान करण्यासाठी पीपीएफची सुरुवात वित्त मंत्रालयाने केली.
- पीपीएफ ही स्वयंसेवी भविष्य निर्वाह निधी योजना आहे. . कोणताही भारतीय नागरिक हे खाते उघडू शकतो.
- खात्यात किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रुपये जमा केले जाऊ शकतात.
- हे खाते १५ वर्षांच्या कालावधीसाठी आहे. ते पाच वर्षांसाठी वाढवता येऊ शकते.
- पीपीएफ खाते उघडल्याच्या सातव्या आर्थिक वर्षापासून दरवर्षी आंशिक पैसे काढता येतात.
३. सामान्य भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ)
- सामान्य भविष्य निर्वाह निधी योजना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे.
- सर्व कायमस्वरूपी कर्मचारी आणि पुनर्रोजगार पेन्शनधारक जीपीएफ खाते उघडू शकतात.
- या योजनेअंतर्गत मासिक पगाराच्या किमान ६ टक्के रक्कम जीपीएफ खात्यात जमा करावी लागेल.