मुक्तपीठ टीम
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबियांवर निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी त्यांच्या बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना थेट प्रश्न विचारले आहेत. अजित पवारांनी बहिणींच्या नावे बेनामी संपत्ती जमवली हे मान्य आहे का? इंडिकॉम प्रा. लि. कुणाची? अजित पवारांना किती वर्षांपूर्वी १०० कोटी दिलेत? असे काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. तसेच पवार कुटुंबातील कुणीही मी दिलेल्या पुराव्यातील एक तरी कागदपत्र खोटा आहे हे सिद्ध करावं, असं आव्हानही दिलं आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्य यांनी सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत त्यांनी पवार कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत.
अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेशी बेईमानी केली की बहिणींशी?”
- किरीट सोमय्या म्हणाले, “अजित पवार यांनी आयकर विभागाची धाड पडल्यानंतर पहिल्याच दिवशी विधान केलं की माझ्या बहिणी निता पाटील, विणा पाटील, मेव्हणे, मोहन पाटील यांच्या घरी आयकराच्या धाडी कशाला? त्यांचा काही आर्थिक व्यवहार नाहीये.
- माझ्याकडे पुरावे आहेत.
- जरंडेश्वर साखर कारखान्यापासून अजित पवार यांच्या ७० बेनामी संपत्तीत, कंपन्यांमध्ये अजित पवारांच्या बहिणी, मेहुणे भागीदार आहेत.
- मग अजित पवारांनी महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेशी बेईमानी केली की आपल्या बहिणींशी बेईमानी केली?”
ते शरद पवार यांना मान्य आहे का?
- “बहिणींच्या नावाने कंपन्यांमध्ये भागिदारी आहे, संपत्ती आहे.
- आपण म्हणता त्यांचा काही संबंध नाही.
- मग बहिणींच्या नावाने देखील बेनामी संपत्ती केली का?
- ते शरद पवार यांना मान्य आहे का?
- तसेच “माझं शरद पवार यांना आव्हान आहे की मी हे सर्व आयकर विभागाला पाठवणार आहे.
- सहकार मंत्रालयाला पण पाठवणार आहे.
- मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिलेत.
- यातला एक पण कागद खोटा असेल तर शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, सुप्रिया सुळे यांनी मला हे सिद्ध करून दाखवावं.
पवार साहेबांना प्रश्न आहे की, इंडोकोम प्रा. लि. कोणचं आहे?
- अजित पवारांसह त्यांच्या बहिणींच्या घरी आयकर विभागाने छापे घातले. याबाबत बोलताना शरद पवारांनी केंद्रीय यंत्रणांवर कडक टीका केली होती. त्यांनाही आज किरीट सोमय्यांनी प्रत्युत्तर दिलं.
- ठाकरे सरकारचं रिमोट कंट्रोल असणाऱ्या शरद पवारांनी अजित पवारांच्या घरावरील आयकर विभागाच्या धाडींसंदर्भात वक्तव्य केलं होतं.
- पवार साहेबांना माझा प्रश्न आहे की, इंडोकोम प्रा. लि. कोणचं आहे?
- त्यांनी अजित पवार यांना १०० कोटी किती वर्षांपूर्वी दिले होते?
तुम्ही मंत्री आहात जे घोटाळे केलेत त्यावर बोला
- किरीट सोमय्या म्हणाले, “मी जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी हे करतोय, पण पवार परिवार महाराष्ट्राच्या जनतेला लुटण्याचं काम करत आहे.
- ते लुटीसाठी करतात, मी ती लूट जनतेसमोर जनतेसाठी ठेवण्यासाठी काम करतो शरद पवार इतके वर्ष मुख्यमंत्री राहिले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत.
- ठाकरेंचे ११ घोटाळेबाज आता १७ झाले.
- ६ राखीव झालेत, हे वाढत चालले आहेत.
- यातील एकही घोटाळा केला नाही असं म्हणण्याची हिंमत ठाकरे-पवारांमध्ये नाही.
- तुम्ही मंत्री आहात जे घोटाळे केलेत त्यावर बोला ना.”