मुक्तपीठ टीम
चीन पाठोपाठ आता उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशाची अधिकृत वृत्तसंस्था KCNA नुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ३,९२,९२० नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर, देशातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या १२,१३,५५० झाली आहे. यादरम्यान देशात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. KCNA ने सांगितले आहे की देशात गेल्या २४ तासात १,५२,६०० रुग्ण बरे झाले आहेत. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत सुमारे साडेसहा लाख रुग्ण बरे झाले आहेत, तर ५.६४ लाखांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी कडक आदेश जारी केले आहेत.
किम यांचे मार्गदर्शक तत्त्वे
- कोरोना प्रतिबंधाबाबत जी काही कठोर पावले उचलता येतील आणि ज्यांची गरज भासेल, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
- एएफपीने राज्य माध्यमांच्या हवाल्याने म्हटले आहे की, किम जोंग उन यांनी लष्कराला औषधांचे वाटप करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
- एएफपीने वृत्त दिले आहे की, कोरोना महामारीमुळे देशात आतापर्यंत ५० मृत्यू झाले आहेत.
किम यांनी पॉलिट ब्युरोची बैठक बोलावली
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, किम जोंग उन यांनी रविवारी कोरियाच्या वर्कर्स पार्टीच्या सेंट्रल कमिटीची पॉलिटब्युरो बैठक पुन्हा बोलावली, ज्यामध्ये कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
- या बैठकीत आरोग्य मंत्रालयाशी संबंधित अनेक वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते.
- या बैठकीतही किम यांनी अधिकारी, मंत्र्यांना स्पष्ट शब्दात औषधांचा अखंड पुरवठा जलद करण्याच्या आणि साथीच्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.
- यामध्ये सर्व राज्यांना वेळेवर औषधांचा पुरवठा होण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
औषधांची दुकाने २४ तास सुरू राहतील
- या बैठकीत किम यांनी सर्व औषधांची दुकाने २४ तास सुरू ठेवण्याचे आदेशही जारी केले आहेत.
- यावेळी त्यांनी सर्व अधिकारी आणि मंत्र्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात कोणतीही चूक करू नये, असा इशाराही दिला आहे.
- जर कोणी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नसेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.