मुक्तपीठ टीम
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या भाजपा विरोधी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहून आपण सत्तेसाठी किती अगतिक आहोत हेच दाखवून दिले आहे. काँग्रेसपुढे गुडघे टेकून महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकणाऱ्या शिवसेनेने राज्याच्या विकासाला वेठीस धरू नये, अशी धारदार टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रवक्ते अतुल शाह, गणेश हाके यावेळी उपस्थित होते.
उपाध्ये यांनी सांगितले की, शिवसेनेने आजवर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या घोषणा देत राजकारण केले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर त्यांच्या परकीय नागरिकत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोरदार विरोध केला होता. काँग्रेस, सोनिया गांधी यांना बाळासाहेबांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत प्रखर विरोध केला होता. मात्र त्यांचे चिरंजीव सत्ता टिकविण्यासाठी याच सोनियांपुढे गुडघे टेकवत आहेत. काँग्रेसपुढे गोंडा घोळण्याच्या नादात मुख्यमंत्र्यांनी व शिवसेनेने राज्याच्या विकासाचा बट्ट्याबोळ करू नये.
तीन पक्षांच्या सरकारमुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. सत्ताधाऱ्यांकडून सुरु असलेली वसुली मोहीम, अनेक सरकारी खात्यातील वाझे, औरंगाबाद सारख्या ठिकाणी उद्योजकांना झालेली मारहाण, रखडलेले विकास प्रकल्प यामुळे राज्यात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक खेटे घालूनही मंत्रालयात कामे होत नसल्याने मंत्रालयासमोर येऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या दोन घटना पाहिल्यावर जनता किती उद्विग्न झाली आहे हेच दिसून येते, असेही उपाध्ये यांनी नमूद केले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भेटीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे शुद्धीकरण करण्याच्या कृत्याने पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने झुकली आहे. या कृत्याबद्दल पुरोगामी विचारवंत मंडळींनी बाळगलेले मौन धक्कादायक आहे, असेही ते म्हणाले. वाशीम येथे भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्या वाहनावर काळे फेकण्याच्या व दगडफेकीच्या प्रयत्नाचा उपाध्ये यांनी तीव्र निषेध केला.