मुक्तपीठ टीम
अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माणासाठी जमीन खरेदी करताना गैरव्यवहार झाल्याचे आरोप बिनबुडाचे आणि तर्कहीन आहेत. नॅशनल हेराल्ड सारख्या वृत्तपत्राच्या मालकी हक्कात घोटाळे करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाला त्यांच्या चारित्र्याप्रमाणे जिकडे तिकडे घोटाळेच दिसतात, असे घणाघाती प्रत्युत्तर भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिले आहे.
एका प्रसिद्धी पत्रकात उपाध्ये यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी राम मंदिर निर्माणासाठी झालेल्या जमीन खरेदीची व्यवस्थित माहिती घेतली असती तर त्यांनी भाजपा आणि रा. स्व. संघावर बिनबुडाचे आरोप करण्याचे धाडस दाखविले नसते. या खरेदी व्यवहारात कोणताही घोटाळा झालेला नाही. शासनाने निर्धारित केलेल्या जमिनीच्या सध्याच्या बाजारभावानुसारच हा खरेदी व्यवहार झाला आहे. २०१९ मध्ये हरीश पाठक यांनी ही जमीन दोन कोटी रुपयांत सुल्तान अन्सारी बिल्डर व अन्य ८ भागीदारांना विकण्यासंबंधी करार नोंदविला (रजिस्टर्ड)होता. या खरेदी व्यवहारासाठी ५० लाख रुपये देण्यात आले होते. त्यावेळी रामजन्मभूमी संबंधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला नव्हता. त्या वेळी अयोध्येतील जमीनाचे दर खूप कमी होते. हा निकाल लागल्यानंतर १८ मार्च २०२१ रोजी पाठक यांनी हा करारनामा रद्द केला. हा करार रद्द झाल्याशिवाय पाठक यांना ही जमीन विकता येणार नव्हती. त्याच दिवशी म्हणजे १८ मार्च रोजी त्यांनी ही जमीन सुल्तान अन्सारी बिल्डरला याच दराने म्हणजे २ कोटी रुपयांना विकली. सुल्तान अन्सारी यांच्याकडून ही जमीन ट्रस्टने १८.५ कोटी रुपयांत खरेदी केली. २१ मार्च २०२१ रोजी त्या जमिनेचे जे बाजारमूल्य होते. त्यानुसारच खरेदी करार झाला आहे.
नॅशनल हेराल्ड च्या मालकी हक्काबाबत काँग्रेसचे नेतृत्व फौजदारी गुन्ह्यात अडकले आहे. ज्या पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व अशा प्रकारच्या घोटाळ्यात अडकले आहे त्या पक्षाच्या महाराष्ट्रातील चेल्यांना सगळीकडे गैरव्यवहारच दिसणार. या मंडळींनी कितीही अपप्रचार केला तरी सामान्य जनतेचा अशा आरोपांवर विश्वास बसणार नाही, हे काँग्रेस प्रवक्त्यांनी लक्षात घ्यावे, असेही उपाध्ये यांनी पत्रकात नमूद केले आहे.