मुक्तपीठ टीम
देशभरात बेकायदा शस्त्र पुरवठ्यासाठी बिहारकडे पाहिले जाते. त्यातही बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये बेकायदा शस्त्रनिर्मितीचे गृहउद्योगच चालतात, असे म्हटले जाते. अवैध शस्त्रे बनवून पुरवठा करण्यासाठी मुंगेर, लखीसराय, खगडिया, दियारा परिसर कुख्यात आहे. आता गुप्तचर यंत्रणांना मिळालेली माहिती धक्कादायक आहे. काश्मिरातील दहशतवाद्यांची सीमेवर नाकाबंदी झाल्यानंतर त्यांनी बिहारमधील शस्त्र माफियांशी संधान साधले आहेत. गुप्तचर सेवांनी दिलेल्या माहितीच्या आधारे बिहार पोलिसांनी काश्मिरी दहशतवाद्यांना शस्त्रपुरवठा करण्याच्या आरोपाखाली जावेद आलम अन्सारीला अटक केली आहे.
मुंगेरची ही बेकायदा शस्त्रे आता काश्मिरी दहशतवाद्यांपर्यंत सहज पोहोचू लागली आहेत. काश्मीर खोऱ्यात फुटीरतावादी दहशतवाद्यांविरोधातील कारवाईनंतर सैन्याला बिहार कनेक्शन असलेली बेकायदा शस्त्रे मिळत आहेत. गेल्या काही महिन्यांत मुंगेरी शस्त्रास्त्रांच्या अनेक वस्तूंचा मोठ्या प्रमाणात पुरवठा काश्मिरी दहशतवाद्यांना करण्यात आल्याचे आता उघड होत आहे.
काश्मिरमधील लष्कर-ए-मुस्तफाचा कमांडर हिदायत उल्लाह मल्लिक याला मुंगेरहून अवैध शस्त्रे पुरविण्यात आल्याचे गुप्तचर संस्थांना कळले. केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या माहितीच्या आधारे बिहार एसटीएफने त्याला अटक केली. या संपूर्ण प्रकरणात जावेदची सखोल चौकशी आणि केंद्रीय यंत्रणांच्या चौकशी अहवालात अनेक खळबळजनक घटना उघडकीस आल्या आहेत.
मुंगेर येथून अवैध शस्त्रे बनवणारे काही कारागीरही काश्मीरमध्ये गेले आणि तेथील फुटीरवाद्यांसाठी त्यांनी बेकायदा शस्त्रे बनवली, अशी माहितीही मिळाली आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणांनीही अशा अवैध धंद्यात अडकलेल्या किंवा बाहेर जाऊन शस्त्रे बनविणारे काही अवैध व्यापारी शोधले आहेत. सध्या त्यांचा शोध वेगात सुरू आहे. त्याच्या अटकेनंतर त्यांनी कुठे आणि कोणासाठी शस्त्रे तयार केली आहेत याबाबत माहिती मिळू शकेल.
असा बदलतोय बेकायदा शस्त्रास्त्रांचा ट्रेंड…
- गेल्या काही महिन्यांपासून या भागातील एसटीएफ आणि स्थानिक पोलिसांकडून सुरू असलेल्या बेमुदत छापा आणि तस्करांवर व्यापक कारवाईमुळे येथील अवैध व्यावसायिक आणि तस्करांचे कंबरडे मोडले.
- पण त्यांनी धंदा बंद केला नाही. फक्त पद्धत बदलली.
- त्यांनी आता आपल्या बेकायदेशीर व्यवसायाचे विकेंद्रीकरण केले आहे.
- हे व्यापारी ज्या ठिकाणी ऑर्डर मिळतात त्याच ठिकाणी जाऊन अवैध शस्त्रे बनवतात.
- ते यापुढे त्यांच्या घरी किंवा लपण्याच्या ठिकाणी बेकायदेशीर शस्त्रे बनविण्याचा धोका घेत नाहीत.
शस्त्रांसाठी बिहारकडे का वळले दहशतवादी?
- भारताने काश्मीरमधील पाकिस्तान सीमा सिल केल्या आहेत.
- तेथे बरीच दक्षता वाढविण्यात आली आहे.
- तारांच्या घनदाट वेटोळ्यांबरोबरच सीमेवर नाईट-व्हिजनसह अनेक आधुनिक देखरेख यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. यामुळे, सीमेवरून शस्त्रांची तस्करी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
- नेपाळ आणि बांगलादेशच्या सीमेवर दक्षता वाढल्याने तेथून होणारी शस्त्रास्त्रांची तस्करी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
- त्यामुळेच दहशतवादी मुंगेरच्या बेकायदा शस्त्रास्त्रांचा वापर करत आहेत.
- बिहारी धंदेवाले काश्मिरात किंवा ज्यांना शस्त्रे पाहिजे तेथे जाऊन कारागिरांकडून शस्त्रे बनवतात, तर बिहारच्या काही लोकांना बोलवून त्यांना आयडी बनवण्याच्या पद्धतीही शिकवल्या आहेत अशी माहितीही मिळू लागली आहे.