मुक्तपीठ टीम
पनवेल: येत्या मार्चअखेरीस ठेवीदारांच्या विमा संरक्षणाची मुदत संपुष्टात येत आहे. रिझर्व्ह बँकेने अद्याप कर्नाळा बँकेसंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही. कधी घेईल याचा काही अंदाज लागत नाही. अशा परिस्थितीत पुढच्या कालावधीसाठी बँकेने ठेवींच्या विम्याची रक्कम अदा केली नाही तर मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागेल. त्यात बँकेकडे पैसे नसल्याने आणखी अडचणीत भर पडत असल्याने आतापासून विम्याचे ४० लाख आणि ऑडिट फीच्या रकमेची तरतूद आतापासून करावी, त्यासाठी कर्ज वसुलीवर भर द्यावा, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीने प्रशासक जी. जी. मावळे यांच्याकडे केली.
कर्नाळा बँक घोटाळ्यात विविध राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांचे हात आहेत. त्यात ठेवीदार नाहक भरडले गेल्याने पनवेल संघर्ष समितीने कायदेशीर मार्गाने लढा तीव्र करून ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने कालची तिसरी बैठक बँकेत मावळे यांच्या दालनात संपन्न झाली. त्यावेळी संघर्ष समितीने धोक्याची सुचना ओळखून हे पर्याय बँक प्रशासनासमोर ठेवले. संघर्षच्या सुचनांचे स्वागत करून कार्यवाही करणार असल्याचे प्रशासक मावळे यांनी शिष्टमंडळाला ग्वाही दिली.
विशेष म्हणजे बँकेचा घोटाळा उघडकिस आल्यानंतर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी 150 कामगारांपैंकी अतिरिक्त कामगारांची कपात केली. काहींनी स्वखुशीने राजीनामा देवून बँकेचा निरोप घेतला तर बँकेच्या विविध शाखेत सध्या 40 कामगार, अधिकारी कार्यरत आहेत. त्यांना गेल्या 18 महिन्यांपासून पगार दिला नसल्याने त्यांच्या कुटुंबाचीही वाताहत झाली आहे, याकडे पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी मावळे यांचे लक्ष वेधले. त्यांना पगार मिळावा, विम्याच्या हफ्त्याची तरतूद आणि ऑडिट फीची जुळवाजुळव होईल अशारितीने कर्ज वसुली करावी असेही त्यांना सांगण्यात आले.
यावर प्रशासक मावळे यांनी कर्ज वसुली अधिकाऱ्यांना प्रकरणाचे गांभीर्य पटवून देत तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.
बँकेच्यावतीने चर्चेत प्रशासक मावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण म्हात्रे, कर्ज वसुली अधिकारी पाटील तर पनवेल संघर्ष समितीच्या शिष्टमंडळात कांतीलाल कडू, संपर्कप्रमुख भास्करराव चव्हाण, संघटक मल्लिनाथ गायकवाड, खजिनदार संतोष शुक्ला आणि महेंद्र पाटील सहभागी झाले होते.
१४ कोटीच्या नव्या घोटाळ्याची भर!
…………………………………….
विशेष जिल्हा लेखापरीक्षण अधिकारी उ. गो. तुपे यांच्या अहवालानंतर कर्नाळा बँकेचा 512 कोटीचा घोटाळा उघड झाला आहे. त्यात आणखी दोन कर्ज प्रकरणांची आता नव्याने भर पडली आहे. कुरु पुंजानी यांच्या नावाने 6 कोटी 6 लाख तर विशाल इंटरप्राईजेसचे मालक मुकुंद म्हात्रे यांच्या नावाने 14 कोटीच्या घोटाळ्याचे नवे प्रकरण समोर आल्याने बँक घोटाळ्याचा आकडा 526 कोटींवर गेला आहे. हा आकडा नजीकच्या काळात वाढणार असून अनेक पांढऱ्या बंगल्याची झोप उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बँकेकडे अवघी दोन लाखाची रोकड!
………………………………….
घोटाळ्यानंतर बँकेने ठेवीदारांची विश्वासार्हता गमावली आहे. त्यामुळे उलाढालीवर आपोआप निर्बंध आले आहेत. पर्यायी बँकेच्या तिजोरीत अवघ्या दोन लाखाच्या आसपास रोकड शिल्लक असल्याचे बैठकीच्या दरम्यान सांगण्यात आले. त्यामुळे विमा हफ्त्यासाठीच्या वसुलीवर भर दिला जावा, या मागणीचा प्रशासनाकडे संघर्ष समितीने धोशा लावला आहे.