मुक्तपीठ टीम
526 कोटीच्या बँक घोटाळ्यानंतर राजाश्रय आणि काही प्रमाणात लोकाश्रय लाभल्याने राजकीय नेते असलेले विविध पक्षातील आरोपी मोकाट आहेत. त्यांच्यावर अटकेची आणि मालमत्ता जप्तीची कारवाई होत नसल्याने पनवेल संघर्ष समितीने युक्ती लढवत हे प्रकरण अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) दिले आहे. त्यांनी गंभीरतेने प्रकरण हाताळणार असल्याची ग्वाही दिली आहे. ईडीचे महाराष्ट्र विभागीय विशेष संचालक सुशीलकुमार यांची काल संघटनेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी भेट घेतली.
पनवेल-उरणसह रायगडातील 50 हजार ठेवीदारांच्या 529 कोटीच्या ठेवी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत अडकल्या आहेत. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा राजकीय राज्याभिषेक करत 5 ऑगस्ट 1996 रोजी कर्नाळा बँक सुरू करण्याचा घाट विवेक पाटील आणि रामशेठ ठाकूर यांनी घातला होता. शेकाप नेत्यांच्या राजकीय आणि उद्योग व्यवसायाच्या जडणघडणीत कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचे पैसे वापरले गेले आहेत. त्याशिवाय बोगस मतदानाकरिता बँकेचे खातेदार असल्याचे ओळखपत्रेही बनविली गेली होते. असे अनेक कांड करून राजकीय नेत्यांनी पद्धतशिर कट रचून कर्नाळा बँक सुरुवातीपासून बुडवली आहे.
526 कोटीचा घोटाळा उघड झाल्यानंतर आजही अनेक आरोपी जात्यात तर काही सुपात आहेत. काहींनी कारवाई टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’वर खेटा सुरू केल्या आहेत. गृह आणि सहकार खाते राष्ट्रवादीकडे असल्याने पक्षांतर, अभय मिळवण्याचा प्रयत्नही सुरू आहे.
दुसरीकडे सीआयडने तपास सुरू ठेवला असला तरी तो कूर्मगतीने आहे. सहकार खात्याची चौकशीही बासनात गुंडाळायला वेळ लागणार नसल्याने विरोधात शड्डू ठोकून सगळीकडून पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी रान उठविले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कर्नाळा प्रकरण ईडीकडे देण्यासाठी कडू यांनी सुशीलकुमार यांना निवेदन दिले होते. त्यानुसार काल गुरुवारी, (ता. 11) दुपारी 3 वाजता ईडीच्या मुंबई कार्यालयात तब्बल दीड तास उभयतांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली.
सीआयडी दोषारोपपत्र दाखल करेपर्यंत वाट पाहतो. त्यांच्याकडून जर अद्याप विलंब होत असेल तर ईडी या प्रकरणी स्वतंत्ररित्या तपास सुरू करेल. पनवेल संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनाचा अभ्यास केला आहे. जोडलेल्या पुराव्यांची शहानिशा केली आहे. काम सुरू झाले आहे. आमच्याकडेही अधिकारी कमी आहेत. त्यात अत्यंत महत्वाच्या पाच केसेस दाखल झाल्या आहेत. त्यांचा तपास सुरू आहे. मात्र कर्नाळा बँक घोटाळ्यावर लवकरच काम सुरू होईल, असा ठोस शब्द सुशीलकुमार यांनी कांतीलाल कडू यांच्या शिष्टमंडळाला दिला.
शिष्टमंडळात संतोष कुमार शुक्ला, योगेश पगडे आणि हरीश पाटील आदींचा समावेश होता. सदर प्रकरणी नेटाने पाठपुरावा करण्यासाठी सुशीलकुमार यांना वारंवार भेटावे लागणार असल्याने त्यांनी भेटीची वेळ द्यावी अशी विनंती केल्याने त्यांनी कडू यांना तात्काळ होकार दिला आहे.
ईडीमुळे घोटाळ्याची पाळेमुळे उखडली जातील
एकंदर कर्नाळा प्रकरणाच्या तपासाला आता खऱ्या अर्थाने गती येईल आणि कर्नाळा घोटाळ्याची पाळेमुळे उखडली जातील याची खात्री पटली असल्याची समाधानकारक प्रतिक्रिया कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांसाठी निष्पक्षपणे लढणारे सामाजिक नेते कांतीलाल कडू यांनी दिली आहे.