कॉमेडियन कपिल शर्माची फसवणुक केल्याप्रकरणी डीसी डिझाईन कंपनीचे मालक दिलीप छाब्रिया याच्याविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. व्हॅननिटी व्हॅन बनवून देण्यासाठी दिलीपने कपिलकडून घेतलेल्या ५ कोटी ३० लाख रुपयांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल होताच त्याचा तपास गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे सोपविण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु करण्यात आला आहे. लवकरच दिलीप छाब्रियाला या गुन्ह्यांत अटक करुन त्याची चौकशी केली जाणार आहे.
दिलीप हा डीसी डिझाईनचा मालक असून त्याने आतापर्यंत अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले होते, त्यात आता आणखीन एका फसवणुकीच्या गुन्ह्यांची भर पडली आहे. तीन वर्षांपूर्वी दिलीप आणि कपिल शर्मा यांची भेट झाली होती, कपिलला त्याच्या कपिल शर्मा शोसाठी एका व्हॅनिटी व्हॅनची गरज होती, ही व्हॅन बनवून देण्यासाठी त्याने दिलीपला ५ कोटी ३० लाख रुपये दिले होते. ही रक्कम मार्च २०१७ ते मे २०२० या कालावधीत देण्यात आली होती. मात्र ही रक्कम दिल्यानंतर दिलीपने त्याला व्हॅनिटी व्हॅन बनवून दिली नाही, उलट त्याच्याकडे जीएसटी रक्कम म्हणून ४० लाख रुपये आणि पार्किंगच्या नावाने आणखीन ६० लाख रुपयांची मागणी सुरु केली होती. याच कारणावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. या वादानंतर कपिलने राष्ट्रीय कंपनी लवादाकडे धाव घेऊन तिथे दिलीपविरुद्ध तक्रार केली होती. लवादाने त्याची दखल घेत डीसी डिझाईनचे सहा बँक खाती गोठविली होती. सतत पैशांची मागणी केल्यानंतर सप्टेंबर २०२० साली कपिल शर्मा यांनी दिलीप छाब्रियाविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांकडून शहानिशा सुरु होती. अखेर गुरुवारी वर्सोवा पोलिसांनी दिलीपविरुद्ध फसवणुकीसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
या गुन्ह्यांचा तपास सीआययूकडे वर्ग करण्यात आले. गुन्हा दाखल होताच कपिल शर्माने गुरुवारी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली होती, तसेच त्यांना या गुन्ह्यांची माहिती दिली. या माहितीनंतर पोलीस आयुक्तांनी सचिन वाझे यांना तपासाचे आदेश दिले होते. फसवणुकीच्या गुन्ह्यांत दिलीप छाब्रियाचे नाव आल्यानंतर आपण पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती, त्याने व्हॅनिटी व्हॅनचे पूर्ण पैसे घेऊनही त्याला व्हॅन दिली नाही. त्यामुळे आपण त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती, अखेर गुरुवारी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाल्याचे कपिल शर्माने पत्रकारांशी बोलताना सांगितले. दुसरीकडे नवीन गुन्हा दाखल झाल्याने दिलीप छाब्रियाच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.