मुक्तपीठ टीम
रोडपाली येथील मार्बल मार्केट येथील प्रकल्पग्रस्त स्थानिक टेम्पो चालक, मालक सामाजिक संघाच्या नामफलकाचे अनावर संघटनेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या हस्ते केले, त्यावेळी त्यांनी प्रस्थापितांवर टीकेची झोड उठवली.
आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि गटनेते परेश ठाकूर यांच्या घरात दोन वेळा खासदारकी, तीन वेळा आमदारकी, दोन वेळा नगर परिषद आणि महापालिकेची सत्ता अशी ३०-३५ वर्षे सत्ता उपभोगूनही पनवेलसह परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळू शकल्या नाहीत, याचा आता विचार करण्याची वेळ प्रत्येक नागरिकावर येवून ठेपली असल्याचे सांगून कडू यांनी सत्तापिपासूंवर सडकून टीका केली.
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या आणि आगरी समाजाच्या नावाने राजकारण करणार्यांनी समाजाला खड्यासारखे बाजूला केले. अन्यथा अडीच वर्षानंतर आगरी समाजाचा महापौर बसवता आला असता. पण तसे करण्याची ठाकूरांची मानसिकता नसल्याचे कडू यांनी सांगितले. विमानतळ आंदोलनात आघाडीवर राहिलेले उपमहापौर जगदीश गायकवाड सध्या आहेत कुठे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. टक्केवारीशिवाय कामे होत नाहीत. झालेली कामेही गुणात्मक, दर्जात्मकदृष्ट्या अतिशय सुमार दर्जाची आहेत. नियोजनाचा पूर्ण अभाव असल्याने मार्बल मार्केटच्या रस्त्यांसह इतर शहरातील रस्ते खड्ड्यात हरवले आहेत, असे त्यांनी स्पष्ट करून विरोधी पक्ष नेते ग्रामपंचायत सदस्य असल्यासारखे वागतात. त्यांना अजून त्यांची जबाबदारी कळाली असे काम त्यांच्या हातून होताना गेल्या चार वर्षात दिसले नाही.
पनवेलमधील एका नेत्याला जेलमध्ये पाठविले आहे. अजून खूप काम बाकी आहे. अनेकांना जेलमध्ये पाठवून पनवेलच्या राजकारणातील घाण काढण्याचे काम तुम्हा-आम्हाला नजीकच्या काळात करावे लागणार आहे, असाही सूचक इशारा कडू यांनी दिला.
कार्यक्रमाला पनवेल संघर्ष समितीचे पनवेल शहर अध्यक्ष गणेश वाघिलकर, नावडे विभागीय अध्यक्ष योगेश पगडे, वावंजे विभागीय अध्यक्ष डॉ. हेमंत पाटील, रंगकर्मी मोरे, नेरे विभागीय अध्यक्ष सचिन पाटील, लाईन आळी विभागीय अध्यक्ष हरेश पाटील यांच्यासह गोपीनाथ शंकर कडके, महेश शशिकांत कुष्टे, बामेश गौतम पाटील, मार्बल मार्केटचे अध्यक्ष रघुनाथ शेठ, पद्माकर पाटील, विजय भोईर, जनार्दन पाटील, मंगल फडके, नाका अध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष विलास पाटील, सचिव राहूल पगडे, सहसचिव गणेश भोईर, खजिनदार उमेश फडके, सहखजिनदार चंद्रकांत भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.