मुक्तपीठ टीम
राजकीय नेते म्हटलं की ते नानाविध रुपात दिसतात. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचाही अपवाद नाही. नुकत्याच एका कार्यक्रमात शिंदेंनी सफाई कर्मचारी महिलेला आपुलकीनं मंचावर नेलं. तिथं त्यांनी तिच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ते तिच्या पाया पडले. आशीर्वाद घेतले. त्यांनंतर आपल्या भाषणात त्यांनी त्यामागील भूमिकाही मांडली, “सफाई कर्मचारी आमचे देव आहेत, म्हणून मी त्यांच्या पाया पडलो!” टीकाकार म्हणतात तसा तो राजेशाही प्रतिमेतून बाहेर येण्याच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांचा भाग मानला तरी त्याचं स्वागतच केलं पाहिजे, असं मत व्यक्त होत आहे.
भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे त्यांच्या ग्वाल्हेरच्या महाराजांच्या प्रतिमेच्या वलयातून बाहेर येण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. ग्वाल्हेरमध्ये स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि आरोग्य तपासणी करण्यासाठी जिवाजी विद्यापीठाच्या अटल सभागृहात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
घडलं ते धक्कादायक मात्र कौतुकास्पद…
- केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे स्टेजवरून खाली उतरले.
- खाली बसलेल्या एका सफाई कर्मचाऱ्याचा हात धरून त्यांना स्टेजवर आणले. त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांकडून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात केली. त्यानंतर महिला सफाई कर्मचारीला त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसवून सफाई कर्मचारी त्यांचासाठी देव असल्याचे त्यांनी मांडले.
या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी २५ स्वच्छता कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ आणि स्वच्छता किट देऊन त्यांचा गौरव केला. त्याचवेळी त्यांनी महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या पाया पडत स्वच्छता व्यवस्थेत सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ज्योतिरादित्य शिंदे त्यांचा भाषणादरम्यान म्हणाले की, सफाई कर्मचारी आमचे देव आहेत, म्हणून मी त्यांच्या पाया पडलो. यासोबतच ते म्हणाले की, जर कोणी शहरात स्वच्छता राखत असेल तर ते आपल्या सफाई कर्मचाऱ्यांचे परिश्रम आहेत, त्यामुळे त्या सर्वांचा आदर करणे आपले परम कर्तव्य आहे.
संपूर्ण कार्यक्रमात शिंदेच्या शेजारी बसलेली महिला सफाई कर्मचारी खूप आनंदी दिसत होती. त्या म्हणाल्या की केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सर्व सफाई कर्मचाऱ्यांना एवढा सन्मान देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सन्मानाने त्या खूप खूश आहेत आणि यासोबतच महिला सफाई कर्मचाऱ्यांनी शिंदे यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त केली.