मुक्तपीठ टीम
क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या विक्रमाची नोंद आहे. पण सचिनच्या विक्रमाबद्दल इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू जेफ्री बॉयकोटने मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “इंग्लंड संघाचा कसोटी कर्णधार आणि फलंदाज जो रुट सचिनचा विक्रम मोडू शकेल. कसोटी सामन्यात इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करण्यास तो सक्षम असून तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.”
श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणार्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात जो रूटने २२८ धावा केल्या होत्या. त्यामुळे संघाला ७ गडी राखून विजय मिळाला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यांनी १८६ धावा केल्या होत्या, तेव्हा ६ गडी राखून त्यांना विजय मिळाला होता. दोन कसोटी सामन्यांच्या चार डावात त्यांनी ४२६ धावा केल्या होत्या आणि इंग्लंडने श्रीलंकेला २-० ने क्लीन स्वीप केले होते.
जेफ्री बॉयकोटने म्हटले आहे की, “सचिन तेंडुलकरप्रमाणे जो रुटमध्येही २०० कसोटी सामने खेळण्याची क्षमता आहे. तसेच तो कसोटीतील सचिनचा सर्वाधिक धावांचा विक्रम देखील मोडू शकतो. सचिनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये १५,९२१ धावांची नोंद आहे. तसेच जो रूटचे वय ३० वर्ष आहे. त्यांने आतापर्यंत ९९ कसोटी सामान्यात ८,२४९ धावा केल्या आहेत. सामना खेळताना त्याला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही, तर तो सचिनच्या १५,२९१ या सर्वाधिक धावांचा विक्रम मोडू शकतो.”