मुक्तपीठ टीम
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा त्यांचा फोन टॅप केला जात असल्याचा आरोप केला आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास यासंदर्भातलं एक ट्विट केलं होते. “विशेष म्हणजे काही एजन्सीजकडून माझ्या व्हॉट्सअॅपवरही निगराणी राखली जात असल्याचं मला वाटत आहे,” असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. जितेंद्र आव्हाडांनी आरोप करताना कुणाचंही नाव न घेतल्याने त्यांचा रोख नेमका कुणाकडे, यावर अनेक तर्कवितर्क लढवले जातायत. त्यातच त्यांनी मध्यरात्रीचे ट्विट सकाळी डिलीट केले असल्याने आव्हाडांच्या फोन टॅपिंगविषयी गूढ निर्माण झालं होतं. मात्र, ‘मुक्तपीठ‘शी बोलताना आव्हाडांनी टॅपिंगच्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे.
जानेवारी २०२० मध्ये शिवसेना खासदार संजय राऊतांनी फोन टॅपिंगसंदर्भात गंभीर आरोप केले होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्याच एका माजी मंत्र्याने त्यांचा फोन टॅप होत असल्याचं सांगितल्याचा दावा केला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
आता जितेंद्र आव्हाडांच्या या आरोपांनंतर महाविकास आघाडी काय भूमिका घेणार? आणि आव्हाडांनी केलेल्या आरोपांची चौकशी करणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.
ट्वीट डिलीट, आव्हाड आरोपांवर ठाम!
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मध्यरात्री फोन टॅपिंग आणि व्हॉट्सअॅप पाळतीचा आरोप केला, त्यांनी तसे ट्विटरवर मांडले, अशा बातम्या आल्या. पण सकाळी ते ट्विट दिसत नाही. ते गायब झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे.
आव्हाड यांनी ते ट्विट डिलीट केले असले तरी फोन टॅपिंगच्या आरोपांवर ठाम असल्याचे ‘मुक्तपीठ’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, “गेले काही दिवस क़ल सुरु होण्यापूर्वी विशिष्ट बीपचे आवाज येत आहेत. माझ्या बोलण्यावर लक्ष असावे, असे आधीही मला वाटले होते. लक्षात आले होते. मी जाहीर मांडलेही होते. आताही तोच प्रकार सुरु असावा. अर्थात कुणी लक्ष ठेवले, माझे कॉल टॅप केले, व्हॉट्सअॅपवर नजर ठेवली म्हणून मी घाबरणार नाही.”