मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. या भयानक पुराचा मोठा फटका कोकणाला व कोकणातील जनतेला बसला आहे. अनेकांना आपल्या कुटूंबातील सदस्यांना पुरामध्ये गमवावे लागले आहे. या दुःखद प्रसंगी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेची टीम केदार चव्हाण, मितेश घाडी यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत झाली आहे.
रायगडनंतर सध्या चिपळूणमध्ये कार्यरत असलेल्या या टीमसोबत ५ हजार कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य किट, १० हजार ब्लॅंकेट, ५ हजार बिस्लेरी बॉटल, औषधे, लहान बालकांसाठी बिस्कीटे, दूध पावडर व आदी जीवनावश्यक साहित्य आहे.
कोकणावर जे संकट ओढवले आहे ते दूर करण्यासाठी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून शक्य तेवढी मदत केली जाईल. कोकणातील प्रत्येक सदस्य हा जिजाऊ परिवाराचा भाग आहे आणि त्यांना मदत करणं हे आमचे कर्तव्य असल्याचं जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित दादा पवार चिपळूण दौऱ्यावर असताना त्यांनी ‘जिजाऊ’ची रुग्णवाहिका पाहिली. ते आपुलकीनं जवळ आले. रुग्णवाहिका आणि जिजाऊ टीमसोबत फोटो काढला.
उत्स्फूर्तपणे ते म्हणाले, “संकट आलं की मदतीला धावणाऱ्या निलेश सांबरेंच्या ‘जिजाऊ’बद्दल नेहमीच कळतं. अशा संस्थेची महाराष्ट्राला गरज आहे. आम्ही सर्व सदैव ‘जिजाऊ’सोबत आहोत!”
रोहित पवार यांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. चिपळूण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिजाऊ संस्थेचे २५ स्वयंसेवक व ४ रुग्णवाहिका, ५ टेम्पो पुढील काही दिवस मदत कार्यात सक्रिय असल्याचं जिजाऊ संस्थेचे सचिव केदार चव्हाण यांनी सांगितले.