मुक्तपीठ टीम
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात कोरोना रुग्णांवर उपचाराची पुरेशी सोय नसल्यानं तिथं जंबो कोरोना रुग्णालय सुरु करण्यात आलं. पण त्या रुग्णालयात पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्याने जेवढी क्षमता आहे, त्यापेक्षा खूप कमी रुग्णांना तिथं उपचार करणं शक्य होत आहे. त्यामुळे तिथं पुरेशा आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवून ते पूर्ण क्षमतेनं चालवण्याची मागणी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील सावाद येथील कोरोना रुग्णालयाकडून स्थानिकांना खूप आशा होती. या रुग्णालयामुळे कोरोना रुग्णालयांच्या उपचाराची आबाळ दूर होईल, अशी अपेक्षा होती. या जंबो कोरोना रुग्णालयात ८५० बेडची सोय आहे. २७ मार्च रोजी या रुग्णालयाचे उद्घाटन झाले. पण एक महिन्यानंतरही तेथे पुरेशा सोयी सुविधा नाहीत. त्यामुळे तेथे २०० रुग्णांवरच योग्य उपचार करणे शक्य आहे. सध्या तेथे रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जावे, यासाठी कित्येक तास रखडावं लागतं.
जिजाऊचे संस्थापक निलेश सांबरे यांनी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे भिवंडीतील सावादच्या जंबो कोरोना रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांच्या अभावाकडे लक्ष वेधले आहे. तेथे जर ऑक्सिजनयुक्त बेड वाढवले, इतर वैद्यकीय सुविधांसह डॉक्टर, नर्स आणि अन्य आरोग्यरक्षकांची संख्या वाढवावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. जर तसं झालं तर ते रुग्णालय नावाप्रमाणेच जंबो रुग्णालय म्हणून पूर्ण क्षमतेनं कार्यरत होऊ शकेल, असं सांबरे यांनी म्हटले आहे.