मुक्तपीठ टीम
“केवळ कठोर कायदे करून महिला व लहान मुलांवरील अत्याचार थांबणार नाहीत, तर त्यासाठी समाजातील मानसिकता बदलणे गरजेचे आहे. प्रत्येक आस्थापनेच्या ठिकाणी महिला सुरक्षा रक्षक नेमल्यास यात नक्की बदल होईल. झलकारी महिला सुरक्षा रक्षक कार्यक्रम पथदर्शी ठरेल,” असे प्रतिपादन अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी केले. अन्याय, अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचे काम ‘झलकारी’ उपक्रमातून होईल, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) व त्रिशरण एनलाईटनमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘झलकारी सुरक्षा रक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप व प्रमाणपत्र वितरण पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. पत्रकार भवनात झालेल्या या सोहळ्याला निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव उज्ज्वल उके, जयंत विके, प्रशांत चौधरी, सचिन कडलग, संयोजिका त्रिशरण एनलाईटनमेंट फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा वाघमारे, प्रशांत वाघमारे, सांची वाघमारे आदी उपस्थित होते.
रामनाथ पोकळे म्हणाले, “सुरक्षित पुणे शहरासाठी मायसेफ पुणे, भरोसा सेल, दामिनी पथक असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. महिलांची छेडछाड, अत्याचार रोखण्यासाठी पोलीस, सामाजिक संस्था कार्यरत आहेत. समाजातील प्रत्येकाचा आत्मसन्मान जपला गेला पाहिजे. सर्वांना समान न्याय देण्याचे कर्तव्य पोलिसांचे असले, तरी समाजातील प्रत्येकाचा सहभाग असणेही तितकेच गरजेचे आहे. ‘झलकारी’ची नेमणूक व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करू. समाजाला आवश्यक असा पथदर्शी उपक्रम त्रिशरण फाउंडेशन राबवत आहे.”
प्रज्ञा वाघमारे म्हणाल्या, “घरेलू कामगार महिलांना अनेकदा सुरक्षा रक्षकांकडून त्रास होतो. सोसायट्या, शाळा, कॉलेज व अन्य ठिकाणी महिला सुरक्षा रक्षक असाव्यात, अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. ‘झलकारी’ उपक्रमातून महिलांना सुरक्षा आणि रोजगार देण्याचे आमचे उद्दिष्ट्य आहे.”
उज्ज्वल उके म्हणाले, “सामाजिक संस्था, शासन आणि कॉर्पोरेट क्षेत्राने एकत्रित काम केले तर परिवर्तन नक्की होते. महिला सुरक्षा, त्यांच्यासाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्याची गरज आहे. महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगार व सुरक्षा पुरविण्याचे काम कौतुकास्पद आहे.” अभिषेक अवचार यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत वाघमारे यांनी आभार मानले.