मुक्तपीठ टीम
खासगी क्षेत्रातील विमान कंपनी जेट एअरवेज आता पुन्हा उड्डाणासाठी सज्ज झाली आहे. एप्रिल २०१९ मध्ये, जेट एअरवेजने मुंबईसाठी शेवटचे उड्डाण केले. आर्थिक संकटामुळे या विमान कंपनीने आपली विमानसेवा बंद केली होती.आता जेट एअरवेज एअरलाइन्सने ऑपरेशनल अपॉइंटमेंट्स सुरू केल्या आणि माजी केबिन क्रू सदस्यांना एअरलाइनमध्ये परत येण्यास सांगितले. एव्हिएशन सेक्टर रेग्युलेटर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजेच डीजीसीएने २० मे रोजी एअरलाइनला व्यावसायिक हवाई ऑपरेशन्स पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली.
यासाठी २४ जूनपासून जेट एअरलाइन्सने ऑपरेशनल अपॉइंटमेंट्सही सुरू केल्या आहेत. यासोबतच कंपनीने आपल्या माजी केबिन क्रू मेंबर्सना एअरलाइनमध्ये परतण्यास सांगितले आहे.
जेट एअरवेज एअरलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कपूर यांनी ट्विट केले की, “आमच्या ऑपरेशनल अपॉइंटमेंट्स सुरू झाल्या आहेत ज्यात आम्ही माजी जेट कर्मचाऱ्यांना परत बोलावले आहे. येत्या काही दिवसांत पायलट आणि इंजिनीअर्सची भरती सुरू होणार आहे.”
जुलै-सप्टेंबर या तिमाहीत विमान कंपनीचे व्यावसायिक हवाई संचालन सुरू होऊ शकते. सध्या एअरलाइनने केवळ महिला क्रू मेंबर्सना परत बोलावले आहे. एकेकाळी खासगी क्षेत्रात वर्चस्व गाजवणाऱ्या जेट एअरवेजने गेल्या महिन्यात ६ मे रोजी तब्बल ३ वर्षांनंतर पुन्हा आकाशात भरारी घेतली हे विशेष आहे. जेट एअरलाइनचे हे उड्डाण चाचणीचाच एक भाग होता.