मुक्तपीठ टीम
जेट एअरवेज पुन्हा हवेत उड्डाण करण्यासाठी सज्ज होत आहे. एकेकाळची नंबर वन विमान कंपनी पुन्हा सुरु करण्यासाठी बोली लावली गेली. ती जिंकणाऱ्या जालान-फ्लोरिअन फ्रिश या समूहाने ते एअरलाइनमध्ये पैसे गुंतवण्यास तयार असल्याचे कळवले. तसेच त्यासाठी कर्ज निराकरण योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया जलद करण्याचे प्रयत्नही सुरु केले आहेत. मुरारी लाल जालान आणि फ्लोरिअन फ्रिश यांनी जाहीर केलेल्या निवेदनानुसार, रिझोल्यूशन प्लॅनच्या जलद अंमलबजावणीसाठी त्यांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलशी संपर्क साधला आहे. ते २०२२मध्ये जेट एअरवेजचे देशांतर्गत ऑपरेशन्स पुन्हा सुरू करण्यासाठीही प्रयत्न करत आहेत.
दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (आयबीसी) अंतर्गत केलेल्या कर्ज निराकरण प्रक्रियेचा भाग म्हणून जालान-फ्लोरिअन फ्रिश समूहाने सादर केलेल्या योजनेला एनसीएलटीने गेल्या जूनमध्ये मान्यता दिली होती. मंजूर योजनेनुसार जेट एअरवेजचे माजी कर्मचारी, कामगार आणि कर्ज देणार्या संस्थांसह सर्व भागधारकांची थकबाकी भरण्यात येईल. त्यांना आवश्यक भांडवल मिळाले असून आता योजना जलदगतीने राबवायची असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी एनसीएलटीकडे केलेल्या अर्जात, २२ डिसेंबर २०२१ पासून ही योजना लागू करण्याचा त्यांचा मानस असल्याचे नमूद केले आहे. जेट एअरवेजच्या ऑपरेशनच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याची प्रक्रियाही वेगवान करण्यात आली आहे. ऑपरेशनल मुद्द्यांवर ते अधिकारी आणि विमानतळ ऑपरेटरच्या संपर्कात आहेत. समूहाचे प्रमुख सदस्य जालान म्हणाले की, “आम्हाला २०२२ च्या सुरुवातीला देशांतर्गत विमान सेवा सुरू करायची आहे. आम्ही जेट एअरवेजचे पुनरुज्जीवन करत असताना नवा इतिहास रचण्यास उत्सुक आहोत.” २०१९ मध्ये मोठ्या कर्जाच्या ओझ्यामुळे जेट एअरवेजला आपले ऑपरेशन बंद करावे लागले होते.
पाहा व्हिडीओ: