मुक्तपीठ टीम
जेट एअरवेजच्या प्रवासी आणि कर्मचारी वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे. तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जेट एअरवेजने पुन्हा एकदा उड्डाण केले आहे. तसेच, हे पहिले उड्डाण चाचणीचा एक भाग आहे. जेट एअरवेजने या ऐतिहासिक क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. यासोबतच कंपनीने सांगितले आहे की, ५ मे २०२२ रोजी जेट एअरवेजचा २९वा वाढदिवस होता.
जेट एअरवेजच्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “५ मे रोजी आमचा २९ वा वाढदिवस आहे. जेट एअरवेजचे पुन्हा उड्डाण! आपल्या सर्वांसाठी खूप भावनिक दिवस आहे. जेट फ्लाइटची आतुरतेने वाट पाहणाऱ्या निष्ठावंत प्रवाशांसाठी हा दिवस खूप खास आहे.”
विमान कंपनीची प्रतिस्पर्धी इंडिगोनेही जेट एअरवेजच्या चाचणीवर प्रतिक्रिया दिली आहे. इंडिगो एअरलाइनने ट्विटमध्ये लिहिले, “अभिनंदन जेट एअरवेज. नवीन सुरुवातीसाठी खूप खूप शुभेच्छा.”
एप्रिल २०१९ मध्ये आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या जेट एअरवेजने शेवटचे उड्डाण केले. यानंतर कंपनीची विमानसेवा ठप्प झाली. तसेच, मुरारी लाल जालान आणि कॅलरॉक कंसोर्टियमने जून २०२१ मध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल नियंत्रित दिवाळखोरी आणि निराकरण प्रक्रियेत जेट एअरवेजची बोली जिंकली. आता सप्टेंबरपर्यंत पुन्हा एकदा जेट एअरवेजची विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात कंपनीकडून संकेतही देण्यात आले आहेत.