मुक्तपीठ टीम
मिरा भाईंदर महानगरपालिकेतील भागांना पाणी पुरवठा करण्यासाठी आठ दिवसांच्या आत आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिली.
मिरा भाईंदर महानगरपालिकेस मुंबई महापालिकेकडून दररोज १.५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जावा अशी मागणी केली आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस आमदार गीता जैन, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, सचिव विलास राजपूत, मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले आदी उपस्थित होते.
मिरा भाईंदर महानगरपालिकेला पाणी देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे. दहिसर चेक नाका ते म्हाडा संकुलपर्यंत जलवाहिनीचे काम मिरा भाईंदर महानगरपालिकेने पूर्ण केले आहे. मिरा भाईंदर महानगरपालिका आणि मुंबई महापालिकेच्या वाहिनीची आंतरजोडणी पूर्ण झाली आहे. मात्र अद्यापही पाणीपुरवठा सुरू झाला नाही, असे आमदार गीता जैन यांनी सांगितले.
यावर सदरच्या जलवाहिनीची तपासणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर काही तांत्रिक कामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी काही कालावधी लागेल, असे बैठकीत सांगण्यात आले.
यावर पाणी देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तांत्रिक बाबी तपासून त्यावर योग्य कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री श्री.पाटील यांनी दिल्या.
यावेळी मुंबई महापालिका उपायुक्त बी. एम. राठोड, जल अभियंता संजय आयते आदी उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिल्या.
घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. सारंगपूरी, खैरे, साठगांव, शिलोत्तर, शिवनेरी, धसई येथील डावातीर कालवा प्रकल्पांवरही चर्चा करण्यात आली.
भातसा धरणाच्या पाणी वापराचे फेर जलनियोजन करून या कालव्यांसाठी आवश्यक पाण्याची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शहापूर तालुक्यातील मुंमरी प्रकल्पाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना ठाणे जिल्हाधिकारी यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.
जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, सचिव प्रकल्प समन्वय विलास राजपूत व संबंधित अधिकारी उपस्थित होते.