मुक्तपीठ टीम
रायगडाच्या मध्यभागी असलेल्या दरबारात आपण उभे राहतो तेव्हा एक सकारात्मक उर्जेची भावना मनात येते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची माहिती गाईड सांगत असताना अवघा राज्याभिषेक सोहळाच नजरेसमोर उभा राहिला होता. उत्सुकतेपोटी ते सर्व ऐकताना अंगावर तेव्हाही काटा आला होता आणि आजही लिहितानाही येतो आहे असा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना असून खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा येणाऱ्या हजारो वर्षे संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी असाच गौरवपूर्ण क्षण आहे अशा शब्दात आपले विचार जयंत पाटील यांनी मांडले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांसाठी आणि रयतेसाठी ६ जून हा आनंदाचा दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिन. याच दिवशी महाराजांच्या नेतृत्वाखाली काळोखाचे तट कोसळून स्वराज्याचा अरुणोदय झाल्याचे जयंत पाटील म्हणाले.
२०१९ साली जानेवारी महिन्यात परिवर्तन यात्रेची सुरुवात रायगडावरून शिवाजी महाराजांना वंदन करून झाली. पक्षाच्या नेत्यांना गडावर येण्यास बराच अवधी होता म्हणून एका टुरिस्ट गाईडकडून गडाची माहिती घेतली. गाईडने गडाबाबत फार सखोल माहिती दिल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना आहे. खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती असे सांगतानाच जयंत पाटील यांनी राज्याभिषेकानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.