मुक्तपीठ टीम
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी मध्यम प्रकल्पाचे काम नोव्हेंबर १९४९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू करण्यात आले. या प्रकल्पाच्या व प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात लवकरच एक बैठक घेण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य सतीश चव्हाण यांनी टेंभापुरी मध्यम प्रकल्पासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती, या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री जयंत पाटील बोलत होते. टेंभापुरी मध्यम प्रकल्पामध्ये बुडीत क्षेत्र ८५४ हेक्टर असून बुडीत क्षेत्रात २ गावे बाधीत झाली असून बाधीत गावठाण क्षेत्र ४०.२९ हेक्टर आहे. सद्यस्थितीमध्ये नागरी सुविधांचे काम करणे बाकी नाही तसेच नागरी सुविधाची कामे ५ मे २०१५ रोजी जिल्हा परिषदांकडे हस्तांतरीत केली आहेत. टेंभापुरी मध्यम प्रकल्पाच्या धरणग्रस्तांना प्रमाणपत्र वाटप करणे तसेच पुनर्वसनासाठी कायद्याप्रमाणे मोबदला देण्यासाठी महामंडळास दिलेल्या सूचनांनुसार पुढील कार्यवाही क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून प्रगतीपथावर असल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील, अंबादास दानवे, अमर काळे, अमरनाथ राजूरकर यांनी सहभाग घेतला.