मुक्तपीठ टीम
मुळा प्रकल्पांतर्गत कालवे नूतनीकरण आणि विशेष दुरुस्ती कार्यक्रम तत्काळ हाती घेण्यात यावा. त्यासाठीचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिले.
मुळा प्रकल्पांतर्गत विविध प्रकारच्या कामांबाबत आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, जलसंपदा सचिव बसवंत स्वामी, मुख्य अभियंता अतुल कपोले आदी उपस्थित होते.
मुळा प्रकल्पांतर्गत कालव्याचे लायनिंग करावे, त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी. यासाठी नियोजन आणि वित्त विभागाकडे पाठपुरावा करावा. प्रशासकीय मान्यता घेऊन पुरवणी मागण्यांमध्ये निधीची मागणी करावी, अशा सूचना मंत्री श्री.पाटील यांनी दिल्या.
या बैठकीत मुळा प्रकल्पांतर्गत उजव्या कालव्यावरील सर्व गेट बदलणे, जायकवाडी बॅंक वॉटर मधील गावांना नागरी सुविधा पुरविणे, भातोडी तलाव मृद आणि जलसंधारण विभागाकडे सोपवणे आदी मुद्यांवर चर्चा झाली.
बैठकीस नाशिकचे मुख्य अभियंता संजय बेलसरे आणि लाभ क्षेत्र विकास विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले. यावेळी जलसंपदा विभागाच्या उपसचिव पौर्णिमा देसाई, अवर सचिव प्रांजली ठोमसे तसेच जलसंधारण आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.