मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यासंदर्भातील कामकाजास गती देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना जलसंपदा मंत्री आणि तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दिल्या.
महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचिकेसाठीच्या तज्ज्ञ समितीची आज बैठक पार पडली.
मंत्रालयातील परिषद सभागृहात झालेल्या या बैठकीला सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा समितीच्या सदस्य सचिव सुजाता सौनिक, सदस्य ॲड. राम आपटे, दिनेश ओऊळकर, विशेष निमंत्रित ॲड. र. वि. पाटील, ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड ॲड. शिवाजी जाधव, ॲड. संतोष काकडे आदी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयातील दाव्याबाबत पुर्वतयारी करावी. आवश्यक असल्यास ज्येष्ठ विधीज्ञ नियुक्त करावे. ज्येष्ठ विधीज्ञांबरोबर चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीतही बैठक घेण्यात यावी, अशी सूचनाही बैठकीत जयंत पाटील यांनी केली.
यावेळी बैठकीत ॲड. शिवाजी जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याबाबतची वस्तुस्थिती सादर केली. सदस्य ॲड. र. वि. पाटील,दिनेश ओऊळकर,ॲड. राम आपटे यांनी आपली मते मांडली.