मुक्तपीठ टीम
जालना, परभणी व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडत असून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज सकाळी बीड येथे नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने पक्षाचा विभागीय आढवा घेण्यासाठी जयंत पाटील सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.
काल संध्याकाळपासून या भागात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे पक्षाची बैठक थोड्या उशिरा आयोजित करत जयंत पाटील यांनी या पूरग्रस्त भागांची पाहणी केली.
मराठवाड्यात अनेक ठिकाणी पुराचे पाणी, नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी आम्ही करत आहोत. मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. जायकवाडी धरणावर देखील आमचे लक्ष आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यात तसेच जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात किती पाऊस झाला याची माहिती घेऊन पुढे काय परिस्थिती उद्भवेल याचा अंदाज घेतला जात असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत
जलसंपदा विभाग कालपासून सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. नुकसान कमीत कमी व्हावे हा आमचा प्रयत्न आहे. मांजरा धरणाची देखील दारे उघडण्याची स्थिती उद्भवली आहे. नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे, असेही जयंत पाटील यांनी आश्वासित केले.