मुक्तपीठ टीम
अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचे आमचे ध्येय आहे आणि आपल्या मदतीने आम्ही ते करणारच असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
विदर्भ, खान्देश, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असा जवळपास ९ हजार किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करत राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा कोकणात पोहोचली आहे. आज रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला.
माणसं आपल्याला सोडून गेली म्हणून हतबल व्हायचे नाही. त्यांना जावून एक टर्म पूर्ण झाली आतापर्यंत आपले नवं संघटन येथे तयार व्हायला हवे होते. त्यामुळे मरगळ झटकून नव्याने पक्षाची बांधणी करा असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
आपला पक्ष सत्तेत आहे. आपल्याला विकासात्मक कामासाठी जी मदत हवी ती मदत केली जाईल. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांच्या मनात स्थान निर्माण करा असेही मार्गदर्शनही केले.
विकासाच्या बाजूने उभा राहणारा एक मोठा गट रत्नागिरीत आहे, पवारसाहेबांवर प्रेम करणारा गट या भागात आहे. या लोकांना आपल्या बाजूला आणण्यासाठी काम करा. मला खात्री आहे हे लोक आपल्या मागे उभे राहतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक चांगला निकाल याठिकाणी मिळेल असा विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
आपल्याला सर्व गटतट बाजूला ठेवून संघटनेवर लक्ष केंद्रीत करावे लागेल. प्रत्येक वेळी प्रांताध्यक्ष येथे येऊ शकत नाही हा बदल तुम्हालाच करावा लागेल. प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसला एक नंबरचा पक्ष बनवण्याचे स्वप्न पाहिले आहे असेही खासदार सुनिल तटकरे म्हणाले.
जयंत या नावाचा अर्थ हा विजय असतो, मला आठवतंय जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली त्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली अनिकेत तटकरे यांची निवडणूक ही पहिली निवडणूक होती आणि अनिकेत तटकरे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते याची आठवण खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितली.
यावेळी खासदार सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी आमदार संजय कदम, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, ज्येष्ठ नेते बाप्पा सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ लिमये, प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, युवती जिल्हाध्यक्षा दिशा दाभोळकर, युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर, किरण शिखरे, किरण शेटये आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.