मुक्तपीठ टीम
भाजपाच्या कडवट टीकाकार मानल्या जाणाऱ्या खासदार जया बच्चन या उत्तरप्रदेशात आक्रमक प्रचार करत आहेत. भाजपावर हल्ला चढवत त्या समाजवादी पार्टीला सत्तेत आणण्यासाठी मतदारांना आवाहन करत आहेत. नुकत्याच एका प्रचारसभेतील भाषणात त्या म्हणाल्या की, “योगी-मोदी यांनी आश्रमात जावं, त्यांचा राजकारणाशी काय संबंध आहे? १५ वर्षांपासून मी महिलांच्या संरक्षणासाठीचे काम करत आहे. महिला सुरक्षेबाबत योगी सरकारने केलेले दावे पोकळ आहेत. भाजपचे सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. भाजप फक्त शहरं आणि रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचे काम करत आहे.”
जौनपूरच्या मडियाहून आणि मछलीशहरात जाहीर सभांना संबोधित करताना सपा नेत्या आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांच्यासह कन्नौजच्या माजी खासदार डिंपल यादवही उपस्थित होत्या. जया बच्चन म्हणाल्या की, “अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशला एक्स्प्रेस वेचा रस्ता दाखवला. ते लोकांच्या हृदयावर राज्य करतात. जया यांनी मछलीशहरमध्ये त्यांच्या निधीतून महिलांच्या सुरक्षेसाठी सल्लागार कक्ष सुरू करण्याचे आश्वासन दिले. मंचावरूनच त्यांनी अखिलेश यादव यांच्या सरकारमध्ये झालेल्या विकासकामांवर कविता ऐकवली.”
“वातावरण तापवणाऱ्यांना माहित नाही की, हवामान बदलले आहे”- कन्नौजच्या माजी खासदार डिंपल यादव
- माजी खासदार डिंपल यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर पलटवार करत म्हटले की, वातावरण तापवणाऱ्यांना हवामान बदलले आहे हे माहीत नाही. भाजपला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावे लागेल असे दिसते.
- आपल्या भाषणात कोणाचेही नाव न घेता त्या म्हणाल्या की, जौनपूरमध्ये क्रिकेट खेळले जाते. तुम्ही लोकांनी संपूर्ण संघाला क्लीन बोल्ड केले.
- सपाचे सरकार आल्यास पाच वर्षे मोफत रेशनसोबत तेल-तूपही देऊ, असे आश्वासन दिले.
- महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार असून २२ लाख नोकऱ्याही देण्यात येणार आहेत.
- महिलांचे पेन्शन १८०० रुपये प्रति महिना केले जाईल.
- १२वी उत्तीर्ण विद्यार्थिनींना सरकार ३६ हजार एक रकमी देणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलात महिलांची भरती करण्यात येणार आहे.