मुक्तपीठ टीम
इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीतर्फे १८ ते २० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ‘प्रगत दंतोपचार व दंतरोपण’ यावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. इटली येथील कम्प्युटर एडेड इम्प्लांटॉलॉजी अकॅडमी (सीएआय, इटली) आणि ऑस्ट्रिया येथील इंटरनॅशनल अकॅडमी फॉर अल्ट्रासॉनिक सर्जरी अँड इम्प्लांटॉलॉजी (आयएयुएसआय, ऑस्ट्रिया) या दोन संस्थांनी इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीला शैक्षणिक सहकार्यासाठी सहयोग दिला आहे.
येत्या शुक्रवारी (दि. १८) सायंकाळी ५.०० वाजता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीचे अध्यक्ष डॉ. पंकज चिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी सचिव डॉ. रत्नदीप जाधव, खजिनदार डॉ. विजय ताम्हाणे, सहसचिव डॉ. केतकी असनानी, सहखजिनदार डॉ. कौस्तुभ पाटील उपस्थित होते.
डॉ. पंकज चिवटे म्हणाले, “दंतवैद्यकांना एकत्रित आणून नवतंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे, जगभरातील नाविन्यपूर्ण, डिजिटल डेन्टिस्ट्रीचा प्रचार व प्रसार करून अत्याधुनिक उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांना व डॉक्टरांना एकत्र आणणे, या उद्देशाने ही परिषद महत्वपूर्ण ठरणार आहे. तीन दिवसीय या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अत्याधुनिक मशिनरी, विविध प्रगत संगणक प्रणाली, थ्रीडी प्रिंटिंग, स्कॅनिंग, रोबोटिक सारख्या नव्या दंतोपचार व दंतरोपण उपचारांवर चर्चा होणार आहे. देशभरातून ८०० हुन अधिक दंतवैद्यक सहभागी होणार आहेत. भारतासह अमेरिका, इंग्लंड,, इटली, इजिप्त, ग्रीस, टर्की, ऑस्ट्रिया, पोलंड या देशातूनही काही दंतवैद्यक सहभागी होतील. सहा देशातील तज्ज्ञ दंतवैद्यक मार्गदर्शक म्हणून येणार आहेत.”
डॉ. रत्नदीप जाधव म्हणाले, “उद्घाटन समारंभानंतर ख्रिस्तोफ पावलोनी (दंतवैद्यक क्षेत्रात डिजिटल मार्केटिंग प्रभाव), परिषदेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. बरबरा सोब्जाक (इनोव्हेटिव्ह डिजिटल ट्रीटमेंट), डॉ. हाईथम शराशर (डिजिटल डेन्टिस्ट्रीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स), डॉ. पानोस डायमंटोपौलोस (संगणकप्रणीत दंतरोपण व शस्त्रक्रिया), डॉ. जॉर्ज झोरोग्लानिडीस (स्टॅटिक गायडेड सर्जरी व डायनॅमिक नेव्हिगेशन इन इम्प्लांटॉलॉजी), सॅण्डर पोलॅन्को (फोरडी डिजिटल वर्क फ्लो), डॉ. झेड. ब्यूरोक हासर (एम गाईड अँड डिजिटल वर्क फ्लो), डॉ. संदीप गानी (सिम्युलेशन इंटिग्रेटेड डिजिटल डेंटिस्ट्री), डॉ. निकोला डी रोबेर्टीस (झिरो बोन रिमूव्हल टेक्निक), डॉ. गुलशन मुरगई (डिजिटल डेन्टिस्ट्रीमधील बदलते दृष्टीकोन), डॉ. सतीश पलायम (रोबोटिक सर्जरी), डॉ. परेश पटेल (डिजिटल डेन्टिस्ट्री अप्रोचेस इन मल्टिपल रिस्टोरेटिव्ह सिच्युएशन्स), डॉ. दीपक भगत (दंतवैद्यक व दंत तंत्रज्ञ यांच्यातील समन्वय) यांची मार्गदर्शन सत्रे होणार आहेत. तसेच ‘भविष्यातील तंत्रज्ञानाचा वैद्यकीय सेवेवर होत असलेला परिणाम’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे.”
इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्री :
ज्ञान, प्रशिक्षण व संशोधनाने प्रगत दंतोपचाराला लोकाभिमुख करणारे व्यासपीठ आहे. या संस्थेची फेब्रुवारी २०२२ मध्ये स्थापना केली. अत्याधुनिक मशिनरी, विविध प्रगत संगणक प्रणाली, थ्रीडी प्रिंटिंग, स्कॅनिंग, रोबोटिक आदींचा उपयोग करून उपचार करणे शक्य झाले आहे. या प्रगत दंतोपचाराला अधिक लोकाभिमुख करण्याच्या, तसेच तंत्रज्ञानाधारित उपचार करणाऱ्या तज्ज्ञ दंतवैद्यकांना एकत्रितपणे काम करता यावे, तसेच या क्षेत्रात वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉक्टरांना नवतंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे, जगभरातील नाविन्यपूर्ण, डिजिटल डेन्टिस्ट्रीचा प्रचार व प्रसार करून अत्याधुनिक उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांना व डॉक्टरांना एकत्र आणणे, ही प्रामुख्याने संस्थेची उद्दिष्टे आहेत. संस्थेच्या अध्यक्षपदी डिजिटल डेन्टिस्ट्रीमधील तज्ज्ञ डॉ. पंकज चिवटे, सचिवपदी ओरल इम्प्लांटोलॉजिस्ट डॉ. रत्नदीप जाधव, तर खजिनदारपदी डेंटल इम्प्लांट्स अँड कॅड-कॅम डेन्टिस्ट्री तज्ज्ञ डॉ. विजय ताम्हाणे, सहसचिवपदी डॉ. केतकी असनानी, सह खजिनदारपदी डॉ. कौस्तुभ पाटील, वैज्ञानिक संचालकपदी डॉ. संजय असनानी, शिक्षण संचालकपदी डॉ. सुरेश लुधवानी हे आहेत. देशभरातील दंतवैद्यक याचे सदस्यत्व स्वीकारत आहेत.