मुक्तपीठ टीम
शत्रुंच्या नौकांवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर तिचा खात्मा होणारच , असा दबदबा असलेली स्वदेशी बनावटीची पहिली क्षेपणास्त्रवाहू ‘कॉर्व्हेट (नौका) आयएनएस खुकरी’ गुरुवारी, २३ डिसेंबर रोजी नौदल सेवेतून निवृत्त झाली.भारताच्या विस्तीर्ण सागरी क्षेत्रात अहोरात्र तब्बल ३२ वर्षांची गौरवशाली सेवा केल्यानंतर तिला विशाखापट्टणम येथे समारंभपूर्वक निरोप देण्यात आला.
ती सेवेत असताना एकूण २८ कमांडिंग अधिका-यांनी ‘कमांड’ केले आणि तब्बल ६ लाख ४४ हजार ८९७ नॉटिकल मैलांपेक्षा जास्त अंतर पार केले. जे पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतराच्या ३० पट किंवा ३ पटीने संपूर्ण जगभर ‘ नॅव्हिगेट ’ करण्याइतके आहे.
ही नौका भारतीय भूदलाच्या गोरखा ब्रिगेडशी संलग्न होती आणि गोरखा ब्रिगेडचे (सेना मेडल) लेफ्टनंट जनरल पी. एन अनंतनारायण या निरोप समारंभाला उपस्थित होते.
२३ आॅगस्ट १९८९ रोजी ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’नी या ‘कॉर्व्हेट’ची बांधणी केली होती. या ‘कॉर्व्हेट’ला नौदलाच्या पश्चिम आणि पूर्व या दोन्ही मुख्यालयातंर्गत असलेल्या ‘फ्लीट्स’चा भाग असण्याचा मान मिळाला होता. विशेष म्हणजे, २३ आॅगस्ट ८९ रोजी या ‘कॉर्व्हेट’ची बांधणी झाली आणि याच तारखेला २३ डिसेंबर रोजी तिला निरोप देण्यात आला.
सूर्य अस्ताला जात असताना, काळोख पडण्यापूर्वी लढाऊ नौकेला समारंभपूर्वक भावपूर्ण निरोप देण्याचा भारतीय नौदलात रिवाज आहे. या समारंभावेळी भारताचा तिरंगा (राष्ट्रध्वज), नौदलाचाही ध्वज आणि ‘डी’कमिशनिंग पेनंट खाली उतरवण्यात येते. यावेळी संबंधित नौदल मुख्यालयांचे ध्वजाधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि निवृत्त माजी कमांडिंग अधिकारी व संबंधित नौकेचे अधिकारी उपस्थित असतात.
या समारंभावेळी पूर्व मुख्यालयाचे व्हाईस अॅडमिरल बिस्वजित दासगुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सूर्यास्त होत असताना, नौदलाच्या रितीरीवाजाने ‘खुकरी’ला अॅडमिरल दासगुप्ता आणि संबंधित नौदल अधिका-यांनी समारंभपूर्वक निरोप दिला.
तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्ण चंद्र पंत यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या समारं•ाात ही ‘कॉर्व्हेट’ नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. त्या समारंभाला दिवंगत कॅप्टन महेंद्र नाथ मुल्ला यांच्या पत्नी सुधा मुल्ला उपस्थित होत्या. आताचे निवृत्त व्हाईस अॅडमिरल निवृत्त संजीव भसीन यांना या नौकेचे प्रथम ‘कमांडिंग अधिकारी ’(सीओ) म्हणून मान मिळाला होता.