मुक्तपीठ टीम
टीसीएसनंतर आता इन्फोसिसनेही या आर्थिक वर्षात मोठ्या संख्येने फ्रेशर्सशाठी नवीन नोकऱ्यांची घोषणा केली आहे. चांगला तिमाही निकाल सादर केल्यानंतर इन्फोसिसने २६ हजार फ्रेशर्सना नोकरी देण्याची गोड बातमी दिली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत कंपनीला ५,०७४ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
इन्फोसिसची झळाळती यशोगाथा…
• इन्फोसिसच्या बोर्डाने ९,२०० कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
• बायबॅकमधील एका शेअरची किंमत १७५० रुपये निश्चित केली गेली आहे.
• कंपनीचा रेव्हेन्यूही २६,३११ कोटी रुपये आहे.
• बायबॅकची शक्यता लक्षात घेता इन्फोसिसचे शेअर्स ३ टक्क्यांनी वाढून १,४८० वर गेले, जी सहा वर्षातील सर्वोच्च पातळी आहे.
• २०२१ मध्ये आतापर्यंत इन्फोसिसच्या शेअर्स मूल्यात ११% वाढ झाली आहे, तर निफ्टी आयटी इंडेक्स ६.६ टक्क्यांनी वाढला आहे.
• २०२१च्या मार्चपर्यंत प्रमोटर आणि प्रमोटर ग्रुपने इन्फोसिसमध्ये १२.९५% टक्के हिस्सा ठेवला आहे.
• इतर सर्व हिस्सा सामान्य गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड, एफपीआय आणि वित्तीय संस्थांचा आहे.
इन्फोसिस ज्या २६ हजार फ्रेशर्सना नोकरी देईल त्यापैकी २४ हजार लोकांना भारतातून आणि २ हजारांना परदेशातून घेतले जाईल. गेल्या आर्थिक वर्षात (२०२०-२१) कंपनीने २१ हजार फ्रेशर्स ठेवले होते. एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार मार्चअखेरपर्यंत २,५९,६१९ कर्मचारी कंपनीच्या सेवेत होते. त्याच वेळी सलग दुसऱ्या तिमाहीत कंपनी सोडणाऱ्यांचे प्रमाण १५% पेक्षा जास्त होते.
इन्फोसिसची प्रगती भन्नाटच…
• कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये १०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. डिजिटल व्यवसायातील कंपनीची भागीदारीही वाढली आहे.
• खास गोष्ट म्हणजे २०१८ पासून आतापर्यंत कंपनीची एकूण मालमत्ता दुप्पट झाली आहे.
• तीन वर्षांत मालमत्ता ३३ अब्ज डॉलर्सवरून ६९ अब्ज डॉलर्सवर गेली आहे.
• २०१८ पासून सीईओ आणि एमडी या पदांवर कार्यरत सलिल पारेख यांनाही या कामगिरीचे श्रेय दिले जाते.