मुक्तपीठ टीम
स्वित्झर्लंडच्या धर्तीवर काश्मिरातील गुलमर्गमध्ये भारतातील पहिला इग्लू कॅफे तयार करण्यात आलाय. संपूर्ण बर्फाच्या या कॅफेत एका वेळी १६ लोकांची बसण्याची क्षमता आहे. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग हे पृथ्वीवरील स्वर्ग मानले जाणारे एक सुंदर हिल स्टेशन आहे. गुलमर्ग समुद्रसपाटीपासून २ हजार ७३० मीटर उंचीवर आहे. गुलमर्गमधील एका स्थानिक हॉटेल ऑपरेटरने देशातील पहिला इग्लू कॅफे बनवला आहे. टुंड्रा प्रदेशात एस्किमो बर्फाचे घर बनवतात. त्याला ते इग्लू म्हणतात. त्याच धर्तीवर हा इग्लू कॅफे उभारण्यात आलाय. बर्फाने बनवलेला हा कॅफे पर्यटक आणि स्थानिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. पर्यटक या इग्लूचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. हे इग्लू आतून २२ फूट रुंद आणि १३ फुट उंच आहे, तर बाहेरून त्याची रुंदी २४ फूट आणि १५ फूट उंच आहे.
हा इग्लू तयार करणारे वसीम शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांना कॅफे बनवण्याची कल्पना सुचली. तेथे त्यांना बर्फाने बनविलेला कॅफे दिसला. त्याच वेळी त्यांनी गुलमर्गमधील पर्यटकांसाठी यासारखाच कॅफेचे ठरवले. सुरुवातीला, वसीमने आपल्या घरात एक छोटासा इग्लू बनवला, ज्याचे पर्यटकांनी चांगलेच कौतुक केले. त्यानंतर त्यांनी गुलमर्गमध्ये एक मोठा इग्लू कॅफे बांधण्याचे काम सुरू केले.
वसीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा इग्लू बनवण्यासाठी २० कर्मचाऱ्यांना १५ दिवस लागले. कर्मचार्यांनी दोन शिफ्टमध्ये हा इग्लू बनविला. इग्लू तयार करण्यासाठी बर्फ दाबून मोठ्या विटांचे आकार देतात. मग त्या विटा सामान्य विटांप्रमाणे जोडल्या जातात. परंतु सिमेंटऐवजी फक्त बर्फाचा वापर केला जातो. कॅफेमध्ये खुर्ची असो की टेबल, सर्व काही बर्फाने बनलेले आहे. कॅफेमध्ये ४ टेबल आहेत, जिथे १६ लोक आरामात बसून खाऊ शकतात. बर्फाने बनवलेल्या या खुर्च्यांवर मेंढीचे कातडे घालण्यात आले आहे. लोक या इग्लूमध्ये येतात आणि बर्फाळ भागात इग्लूमध्ये राहणाऱ्या एस्किमोंच्या जीवनाचा आंनद घेतात.”
इग्लू थंड-थंड, आत गरम-गरम!
• इग्लू बर्फाचा असल्याने बाहेरून पाहिल्यावर असे वाटते की आतील भागात बरीच थंडी असेल
• आश्चर्याची बाब म्हणजे इग्लूचे बाहेरील तापमानापेक्षा आतील तापमान जास्त असते
• भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार, दाबलेला बर्फ इन्सुलेशन म्हणून कार्य करते आणि कोणत्याही उष्णतेस बाहेर पडू देत नाही
• हे इग्लू बाहेरून येणाऱ्या थंड वाऱ्यापासून देखील संरक्षण करते
• याचा परिणाम असा होतो की आतमधील उष्णता आतच राहते
• जर बाहेरील तापमान उणे १० असेल तर आतील तापमान ५ ते १० अंशांदरम्यान असते
वसीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, “त्यांनी पर्यटकांसाठी हे इग्लू उघडल्यापासून त्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. काही तासातच आमच्याकडे ३०पेक्षा जास्त बुकिंग झाल्या. गर्दी इतकी वाढली की आता आम्ही फक्त बुकिंगच्या माध्यमातून या इग्लू कॅफेमध्ये प्रवेश देण्याचे ठरविले आहे. वसीम यांना आशा आहे की, या इग्लूमुळे गुलमर्गमधील पर्यटनाला आणखी चालना मिळेल.
कसा आहे इग्लू कॅफे?
• इग्लू कॅफे जम्मू काश्मीरमधील गुलमर्गमध्ये आहे
• हे इग्लू अशा ठिकाणी तयार केले गेले आहे जेथे सूर्यप्रकाश कमी आहे
• मार्चपर्यंत पर्यटकांसाठी हा इग्लू खुला असेल कारण गुलमर्गमधील तापमान मार्चपर्यंत मायनस मध्ये असते
• वसीमचा दावा आहे की त्यांचा इग्लू सध्या आशियातील सर्वात मोठा इग्लू आहे
• लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदीसाठीही त्यांचे प्रयत्न सुरु आहेत
• या इग्लूला आशिया खंडातील सर्वात मोठ्या इग्लूचा किताब देखील मिळू शकेल.
पाहा व्हिडीओ: