मुक्तपीठ टीम
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पहिल्याच दिवशी युक्रेनमध्ये गंभीर परिणाम दिसून येत आहेत. युक्रेनमध्ये पहिल्याच दिवशी १३७ जणांचा मृत्यू झाला आहे. युद्धामुळे तिथल्या नागरिकांची देश सोडून जाण्यासाठी धडपड सुरु आहे. रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानकांवर मोठी गर्दी दिसत आहे. या युद्धाचा भारतावरही परीणाम होत असून अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहे तर काही आपल्या मायदेशी परतले आहेत. परतलेल्या विद्यार्थ्यांच्या ज्या व्यथा कथा माध्यमांमधून समोर येत आहेत, त्यातून एक समान धागा दिसतोय. तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांकडे मायदेशी परतण्यासाठी पुरेसे पैसेही उरलेले नाहीत.
युक्रेनमधून मायदेशी परतलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, तेथील वातावरण सतत बिघडत आहे. अशा परिस्थितीत तेथे राहणाऱ्या भारतीयांना त्यांच्या मायदेशी परतण्याची चिंता सतावत आहे. युद्धामुळे तिथले विमान प्रवास खूप महाग झाला आहे. पूर्वी २५ हजार रुपयांना मिळणारे तिकिट आता ६० हजार रुपयांना मिळत आहेत.युक्रेनमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी आहेत ज्यांना मायदेशी परतायचे आहे. पण, महागड्या फ्लाइट चार्जेससाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यांनी भारत सरकारला आवाहन केले आहे, तेथून सरकारने सर्व भारतीयांना त्यांच्या स्तरावरून परत बोलावावे, असे एका विद्यार्थ्यांने सांगितले.
तेथील दूतावासाकडून आपल्याला कोणतीही मदत मिळाली नाही. त्याचे आई-वडील घाबरले होते आणि त्याला परत येण्यासाठी सतत फोन करत होते. त्यामुळे स्वतःच्या प्रयत्नाने इथे हा विद्यार्थ्यी परतला आहे. युक्रेनमध्ये त्याचा ऑफलाइन अभ्यास सुरू असल्याचे त्याने सांगितले. मात्र युद्धामुळे परतावे लागले, त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास विस्कळीत होऊ नये, यासाठी ऑनलाइन वर्ग सुरू करावेत, अशी मागणी त्यांनी महाविद्यालयाकडे केली आहे.