मुक्तपीठ टीम
भारतीय लष्कराच्या एका जवानाला हेरगिरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी जवान शांतिमय राणा राजस्थानमध्ये तैनात असून त्याला दोन महिलांनी फसवले आहे. गुप्तचर पोलीस महासंचालक उमेश मिश्रा यांनी सांगितले की, आरोपीने आपल्या रेजिमेंटशी संबंधित गोपनीय माहिती आणि लष्करी सरावाचे व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे कथित महिलांसोबत शेअर केले आहेत आणि तो त्यांच्या जाळ्यात अडकला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
लष्करातील जवान हनी ट्र्रॅपला पडला बळी
- आरोपी काही काळ राज्य पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या रडारवर होता आणि त्याला २५ जुलै रोजी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
- तो गुरनूर कौर उर्फ अंकिता अशी ओळख सांगणाऱ्या पाकिस्तानी महिला एजंटच्या संपर्कात होता.
- निशा नावाची आणखी एक महिलाही त्याच्या संपर्कात होती.
- आरोपीने सांगितले की, अंकिता नावाच्या एका महिलेने त्याला सांगितले की, ते उत्तर प्रदेशातील मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसमध्ये तैनात आहे तर निशा नावाच्या महिलेने सांगितले की ती ‘मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस’मधून आहे.
पाकिस्तानी महिला एजंटनी गुप्त माहितीच्या बदल्यात पैसे दिले
- आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, महिलांनी त्याला फसवूण माहिती विचारली.
- सैनिकाने आपल्या रेजिमेंटशी संबंधित गोपनीय माहिती आणि सैन्याच्या सरावांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले.
- त्या बदल्यात तो पाकिस्तानी महिला एजंटकडून पैसे घ्यायचा.
- डीजी म्हणाले की, आरोपी शांतिमय राणा मार्च २०१८ पासून भारतीय लष्करात तैनात आहे. सध्या आरोपीची चौकशी केल्यानंतर आणि त्याच्या मोबाईलच्या तपासात खात्री झाल्यानंतर आरोपीविरुद्ध अधिकृत गुप्तता कायदा १९२३ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
यापूर्वी मे महिन्यात राजस्थानमधील जोधपूरमध्ये हनीट्रॅपचे प्रकरण समोर आले होते. एका पाकिस्तानी तरुणीने लष्करातील जवानाला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे वचन दिले होते. पाकिस्तानी तरुणीने स्वत: मध्य प्रदेशातील असल्याचे सांगितले होते. दोघांमध्ये व्हिडीओ चॅट्स, व्हॉईस कॉल्स होऊ लागल्या, याची माहिती आयबीला कळताच जवानावर कारवाई करण्यात आली.