मुक्तपीठ टीम
जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता आणि मागणी झपाट्याने वाढत आहे. यात भारतही हळूहळू प्रगतीच्या मार्गावर आहे. यामुळे देश-विदेशातील अनेक बड्या कंपन्या आपली इलेक्ट्रिक वाहने भारतात लॉंच करण्यास उत्सुक आहेत. यामध्ये अमेरिकेतील टेस्ला ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी आहे. टेस्ला अनेक दिवसांपासून देशात इलेक्ट्रिक कार लॉंच करण्याच्या तयारीत आहे. भारतात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कारही रस्त्यांवर दिसल्या आहेत. मात्र टेस्लाच्या भारतात अधिकृत लॉंचिंग संबंधित कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. पण भारतात लॉंच होण्यापूर्वीच एका भारतीय कंपनीने टेस्लाला टक्कर देण्याची तयारी सुरू केली आहे.
ओला इलेक्ट्रिक देणार टेस्लाला आव्हान!… योजनाही आखण्यात आली
- भारतीय कंपनी ओला इलेक्ट्रिक आतापर्यंत फक्त इलेक्ट्रिक स्कूटरपुरती मर्यादित आहे.
- परंतु, ओला कंपनी आता इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्येही उतरण्याचा विचार करत आहे.
- ओलाचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बनवण्याचा विचार करत आहेत.
- याद्वारे ओला इलेक्ट्रिक कंपनी केवळ टेस्लाशीच नव्हे तर इतर इलेक्ट्रिक कार निर्मात्यांसोबतही स्पर्धा करण्याची तयारी करत आहे.
ओलाच्या संस्थापकाने टेस्लाच्या संस्थापकाला आव्हान दिले
ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भावीश अग्रवाल यांनी अलीकडेच एका निवेदनात म्हटले आहे की, “सध्या टेस्लाच्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची किंमत ५० हजार डॉलर म्हणजेच सुमारे ४१ लाख रुपये आहे. अशा स्थितीत जगातील अनेकांना ते विकत घेता येत नाही. ओला कंपनी आता जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बनवून इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात क्रांती घडवू शकते. भाविश यांच्या या विधानाकडे टेस्लाचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांच्यासाठी आव्हान म्हणून पाहिले जात आहे.