मुक्तपीठ टीम
भारतीय नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी आयएनएस कोची आणि कोलकाता यांच्या बरोबरीने शोध आणि बचाव कार्यास सुरुवात केली आहे. मुंबईच्या किनाऱ्याजवळील विकसन क्षेत्रात मुंबईपासून ३५ सागरी मैल अंतरावर बुडालेल्या पी-३०५ या नौकेसाठी ही मोहीम उघडण्यात आली असून यात पी८आय आणि नौदलाच्या हेलिकॉप्टर्सचीही मदत घेण्यात येत आहे. १७ मे २०२१ या दिवशी शोध आणि बचाव मोहीम उघडल्यापासून आतापर्यन्त ६२० जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे.
जहाज | इतके लोक होते | इतके रेस्क्यू करण्यात आले |
बार्ज पी ३०५ | २७३ | १८० |
जीएएल कन्स्ट्रक्टर | १३७ | १३७ |
बार्ज एसएस-३ | २०२ | सर्व सुरक्षित आहेत |
सागर भूषण | १०१ | १०१ |
दुसऱ्या एका मोहिमेत, भारतीय नौदलाचे ‘सी-किंग’ हेलिकॉप्टर जी ए एल कन्स्ट्रक्टर नामक नौकेवरील कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी रवाना करण्यात आले होते. मुंबईच्या उत्तरेला ती अडकली होती. या हेलिकॉप्टरने जी ए एल कन्स्ट्रक्टरवरील १३७ कर्मचाऱ्यांची सुटका केली.
गुजरातच्या पिपावाव किनाऱ्यापासून आग्नेयेस १५-२० सागरी मैलांवर असलेल्या सपोर्ट स्टेशन-३, ग्रेट शिप अदिती आणि ड्रिल शिप सागर भूषण या जहाजांसाठीही शोध व बचाव मोहीम सुरु आहे. नौदलाचे आयएनएस तलवार हे जहाज त्या भागात पोहोचले असून या मोहिमेच्या समन्वयाची सूत्रे या जहाजाने हाती घेतली आहेत. ओएनजीसी आणि जहाजबांधणी महासंचालनालयाशी समन्वय साधून नौदलाच्या पश्चिमी कमानीने (वेस्टर्न नेव्हल कमांड) मदतीसाठी पाच शक्तिशाली कर्षक नौका (खेचून घेणाऱ्या नौका- टग्स) पाठविल्या आहेत. ग्रेट शिप अदिती आणि सपोर्ट स्टेशन-३ यांना नांगर टाकण्यात यश आले आहे. दरम्यान, सागरभूषणच्या मदतीसाठी ‘समुद्रसेवक’ जहाज आणि किनाऱ्यानजीकच्या भागात चील जहाज तैनात करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती आवाक्यात व स्थिर असल्याचे दिसते आहे.
समुद्र अद्यापि अत्यंत खवळलेला आहे. सी स्टेट ४-५ दरम्यान आहे, तर वाऱ्याचा वेग २५-३० नॉट (अंदाजे ३५ – ५५ किमी प्रति तास) इतका आहे. परिणामी, शोध व बचाव मोहिमेत कार्यरत असणाऱ्या जहाजे व हेलिकॉप्टर्सना आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.