मुक्तपीठ टीम
भारतीय लष्कराने २८ डिसेंबर २०२२ रोजी अहमदाबाद छावणी येथे सैनिकांसाठी आपल्या पहिल्या 3D मुद्रित निवासी घराचे उद्घाटन केले. हे निवासस्थान नवीनतम 3D जलद बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करुन MiCoB या व्यवसायिक कंपनीच्या सहकार्याने मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसने (MES) बांधले आहे.
3D मुद्रित पाया, भिंती आणि स्लॅबचा वापर करून गॅरेजच्या जागेसह ७१ चौरस मीटरच्या निवासस्थानाचे बांधकाम अवघ्या १२ आठवड्यांत पूर्ण करण्यात आले. आपत्ती प्रतिरोधक संरचना झोन-३ भूकंप वैशिष्ट्यांचे आणि हरित इमारत मानदंडांचे पालन करून हे निवासस्थान बांधण्यात आले आहे. 3D मुद्रित घरे सशस्त्र दलातील कर्मचार्यांच्या निवासाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक काळातील जलद बांधकाम प्रयत्नांचे प्रतीक आहेत. ही रचना ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’ला चालना देण्यासाठी भारतीय लष्कराच्या वचनबद्धतेचा पुरावाही आहे.
हे तंत्र कॉंक्रिट 3D प्रिंटरचे संगणकीकृत त्रि-आयामी डिझाइन वापरून आणि विशेष उद्देशासाठी डिझाइन केलेले विशिष्ट प्रकारचे कॉंक्रिट टाकून थरावर थर पद्धतीने 3D रचना तयार करते.
अहमदाबाद स्थित भारतीय लष्कराच्या गोल्डन काटर डिव्हिजनने या प्रकल्पामध्येही अनेकविध उपयोजनेसह उद्दीष्टाचा पाठपुरावा करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी आधीच पूर्व निर्मित कायमस्वरूपी संरक्षण आणि ओव्हरहेड संरक्षणाच्या बांधकामात 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा समावेश विकसित केला आहे. या संरचना सध्या एका वर्षाच्या कालावधीसाठी प्रमाणित केल्या जात आहेत आणि लवकरच सर्व भूप्रदेशांमध्ये समाविष्ट केल्या जातील, केंद्रशासित प्रदेश लडाख त्यापैकी एक असेल.