मुक्तपीठ टीम
गंगाजल म्हटले की प्रत्येक भारतीयासाठी एक पवित्र जल. आपल्या घरी गंगाजल असावं असं प्रत्येकालाच वाटतं. त्यातही देवाच्या ठिकाणी गंगाजल असेल तर त्याची पवित्रता अधिकच मानली जाते. उत्तराखंडमधील गंगाजल मातीच्या भांड्यांमध्ये पॅक करून आता १२ ज्योतिर्लिंग तसेच देशातील अन्य धार्मिक स्थळी पाठवले जाईल. यात महाराष्ट्रातील भीमाशंकर, घृणेश्वर यांचाही समावेश असणार आहे. तेथील प्रादेशिक सहकारी संघ म्हणजेच पीसीयूने यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. डेहराडूनमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ३० ऑक्टोबरला ‘गंगाजल’ कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहेत.
सध्या गंगाजलाचे सुमारे दोन लाख पॅकिंग तयार करण्यात आले आहे. ऑर्डर आल्यानंतर पुन्हा गंगाजलाचे पॅकिंग केले जाईल. सध्या ३०० मिली गंगाजलचे पॅकिंग तयार करण्यात आल्याची माहिती मेहरोत्रा यांनी दिली आहे. ३०० मिली गंगाजलच्या पॅकिंगची किंमत १५० रुपये ठेवण्यात आली आहे. भविष्यात मिळालेल्या मागणीनुसार, पॅकिंग त्यानुसार केले जाईल. गंगाजलातून मिळणारे उत्पन्न सहकार क्षेत्रात खर्च करण्यात येणार असल्याचे मेहरोत्रा यांनी सांगितले.
या १२ ज्योतिर्लिंगांचा असणार यामध्ये समावेश
- सोमनाथ ज्योतिर्लिंग, गुजरात
- मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, आंध्र प्रदेश
- महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेश
- ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेश
- केदारनाथ ज्योतिर्लिंग, उत्तराखंड
- भीमाशंकर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र
- विश्वनाथ ज्योतिर्लिंग, उत्तर प्रदेश
- त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र
- वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, झारखंड
- नागेश्वर ज्योतिर्लिंग, गुजरात
- रामेश्वर ज्योतिर्लिंग, तामिळनाडू
- घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र