मुक्तपीठ टीम
परकीय चलन साठ्याच्या बाबतीत भारताने रशियाला मागे टाकले आहे. जगातील चौथ्या क्रमांकाचा परकीय चलन साठा आता भारताकडे आहे. काही महिने या चलनांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती पण, यावर्षी भारत आणि रशियाच्या या परकीय चलन साठ्यात वाढ झाली नाही. परंतु, मार्चच्या सुरूवातीच्या आठवड्यात रशियाच्या परकीय चलनात घट झाली. तर भारत रशियाला मागे टाकत पुढे गेला.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, ५ मार्च रोजी भारताचे परकीय चलन साठा ४.३ अब्ज डॉलरने घसरून ५८०.३ अब्ज डॉलर झाला आहे, तर रशियाचे परकीय चलन साठा ५८०.१ अब्ज डॉलर्स आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार चीनकडे जगातील सर्वात मोठा परकीय चलन साठा आहे. या यादीत जपान दुसर्या आणि स्वित्झर्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आयातीसाठी १८ महिन्यांपर्यंत भारताचा परकीय चलन साठा पुरेसा आहे. करन्ट अकाउंट सरप्लस, देशी शेअर बाजारांमध्ये इनफ्लो आणि परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय) वाढल्यामुळे भारताचा परकीय चलन साठा वाढला आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, परकीय चलन साठ्यांच्या बळकटीकरणामुळे परदेशी गुंतवणूकदार आणि क्रेडिट रेटिंग एजन्सींना असा विश्वास वाटतो की, सरकार आपले कर्ज फेडण्याच्या स्थितीत आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १२ मार्च रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये ही माहिती देण्यात आली आहे की, मागील आठवड्यात परकीय चलन साठा ६८.९ कोटी डॉलर्सने वाढून ५८४.५५४ अब्ज डॉलरवर गेला आहे. २९ जानेवारी २०२१ रोजी अंतिम आठवड्यात परकीय चलन साठा ५९०.१८५ अब्ज डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला होता.