मुक्तपीठ टीम
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बीईएमएल अर्थात भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडच्या बेंगळूरू कॉप्लेक्स इथे झालेल्या कार्यक्रमात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मेट्रो प्रकल्पासाठी चालक रहित मेट्रो गाडीचे उद्घाटन केले. स्वदेशात डिझाईन आणि विकसित केलेल्या चालक विरहीत मेट्रो रेल्वेचे बीईएमएलच्या बेंगळूरू कॉप्लेक्स इथे निर्मिती करण्यात येत आहे.
एमएमआरडीए प्रकल्पात ६३ टक्के स्वदेशी सामग्री असून येत्या दोन-तीन वर्षात हे प्रमाण ७५ टक्यापर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला भारतीय उद्योग क्षेत्राच्या मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाची प्रचीती यातून येत असल्याचे ते म्हणाले.
चालक रहित मेट्रो प्रकल्प म्हणजे इतर भारतीय कंपन्यांना विशेषकरून संरक्षण उद्योगाशी संबंधित उत्पादन केंद्र म्हणून उदयाला येण्यासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे ५ अब्ज अमेरिकी डॉलर्स संरक्षण निर्यात उद्दिष्ट आणि २०२५ पर्यंत संरक्षण उद्योग क्षेत्राची उलाढाल २५ अब्ज अमेरिकी डॉलर्स करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी मदत होणार असल्याचे ते म्हणाले. चालक रहित तंत्रज्ञानाचा रणगाडे, लढाऊ विमाने यासारख्या क्षेत्रात भविष्यात विस्तार होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
मेट्रो निर्मितीमधले बीईएमएलचे पाऊल म्हणजे देशाच्या नागरी वाहतूक क्षेत्रातला निर्णायक क्षण असल्याची भावना बीईएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीपक कुमार होटा यांनी व्यक्त केली.