मुक्तपीठ टीम
राज्यातील नागरिकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शुद्ध, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण पाणी दिले गेले पाहिजे. नागरिकांना पाणी देत असताना त्यांच्या आरोग्याचा प्राधान्याने विचार करण्यात यावा. राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा देशात ‘आदर्श मॉडेल’ म्हणून उभी रहावी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केली.
पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या उभारणीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.
वडगाव बुद्रुक (पुणे) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळा इमारतीचे भूमिपूजन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ संजय चहांदे, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या इमारतीचे काम करताना कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. पुण्याच्या वैभवात भर पाडणारी वास्तू म्हणून उभारणी झाली पाहिजे, असे म्हणत राज्यस्तरीय पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या माध्यमातून दर्जेदार यंत्रणा उभी राहत आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून जनतेची तहान भागविण्याचे काम केले जाते. राज्यातील जनतेला शुद्ध, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण पाणी उपलब्ध करून देण्याचे काम राज्य शासनाच्यावतीने सुरु आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच राज्यातील सामान्य जनतेच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ मधील तरतुदीनुसार पाणी हा प्रत्येक नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. राज्यातील सर्व जनतेला पिण्याचे शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य पाणी तपासणी प्रयोगशाळेचे महत्त्वाचे योगदान असणार आहे. राज्यात विभागीय, जिल्हा व उप विभागीयस्तरावर आजमितीस १७५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. प्रयोगशाळेत प्रथमच जड, विषारी धातू, कीटकनाशके, किरणोत्सारी यासारख्या घटकांची तपासणी करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय प्रयोगशाळा ही पाणी गुणवत्तेसाठी शिखर संस्था असण्याबरोबरच राज्यासाठी संदर्भ संस्था म्हणून काम पाहणार असल्याचेही सांगितले.
कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाणी गुणवत्ता तपासणी प्रात्यक्षिकाची तसेच सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी पंप नळपाणी पुरवठा योजनेची पाहणी करुन माहिती घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले तर आभार अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ यांनी मानले.