मुक्तपीठ टीम
उत्तरप्रदेशमधील शामली येथे एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकून प्रत्येकालाच गंमत वाटेल. गेल्या दोन वर्षांपूर्वी एका व्यक्तीच्या घरातून म्हशीचे रेडकू चोरीला गेले होते. तीन महिन्यांपूर्वी म्हशीचे रेडकू सहारनपूरमधील एका गावात असल्याचे समजले, त्यामुळे पीडिताने ते गाव गाठले, परंतु कुटुंबीयांनी त्याला देण्यास नकार दिला. त्यानंतर पीडित व्यक्तीने गुन्हा दाखल केला. एसपींच्या आदेशानुसार, पशुवैद्यकांचे पथक डीएनए चाचणीसाठी शामली आणि सहारनपूर येथे पोहोचले आणि म्हैस आणि तिच्या रेडकूच्या रक्ताचे नमुने घेतले.
हे प्रकरण उण तालुक्यातील अहमदगड गावचे आहे. या प्रकरणी चंद्रपाल कश्यप सांगतात की, २५ ऑगस्ट २०२० रोजी रात्री चंद्रपाल यांच्या गोठ्यातून म्हशीचे रेडकू चोरीला गेले. त्याने बरेच दिवस शोध घेतला. या चोरीत कुटुंबातील एका सदस्याचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले, पिकअप चालक अरविंद, विनोद आणि हारून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रपाल यांनी सांगितले की, तीन महिन्यांनंतर सहारनपूरच्या बीनपूर गावात सतवीर नावाच्या व्यक्तीच्या घरी म्हशीचे रेडकू असल्याचे समजले.
माहिती मिळताच चंद्रपाल सहारनपूरला पोहोचले आणि म्हशीचे रेडकू परत करण्यास सांगितले मात्र सतवीरने नकार दिला. त्यावर त्यांनी म्हशीचे रेडकू मिळावे म्हणून कायदेशीर लढाई सुरू केली. वरिष्ठांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे आवाहन केले. एसपींच्या आदेशानुसार, बिडोली पोलीस चौकीचे प्रभारी अरुण कुमार मौताला यांच्यासह पाच पशुवैद्यकांचे पथक अहमदगड चंद्रपाल यांच्या घरी पोहोचले.
सहारनपूरच्या बीनपूर गावात सतपालच्या घरी पोहोचल्यानंतर टीम सदस्य चंद्रपाल यांच्यासह त्यांनी म्हशीच्या रेडकुची डीएनए चाचणी केली. या प्रकरणी बिडोली चौकीचे प्रभारी अरुण कुमार यांनी सांगितले की, सतपाल यांना म्हशीच्या रेडकूबाबत विचारले असता, तो कोणतेही योग्य उत्तर देऊ शकला नाही. अहमदगडचे चंद्रपाल आणि सहारनपूरच्या बीनपूर गावचे सतपाल म्हशीच्या रेडकूवर आपला हक्क मांडत आहेत. म्हशीच्या रेडकूच्या चोरीप्रकरणी चंद्रपाल यांनी मुख्यमंत्री आणि उच्च अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. या प्रकरणी एसपी सुकीर्ती माधव यांनी म्हैस आणि रेडकूची डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले होते.