मुक्तपीठ टीम
सोलापूर जिल्ह्यातील अकलुज तालुक्यातील माळेवाडी हे तसे छोटे गाव. पण महाराष्ट्रभरातील कोणत्याही गावाप्रमाणे तिथं महिलांचे सांस्कृतिक सोहळे उत्साहात साजरे केले जातात. त्यानुसारच मकरसंक्रातीपासून हळदीकुंकू कार्यक्रमांचे आयोजन सुरु होते. पण माळेवाडीतील भगिनींनी हा कार्यक्रम असा आयोजित केला की अवघ्या राज्यासमोर छोट्या गावानं मोठा आदर्श ठेवला. त्यांनी विधवा महिलांना आपल्या हळदीकुंकूत सहभागी केले आणि वाण म्हणून सर्वांना वाटली ती पुस्तके!
नेहमी ‘वाण’ द्यायचा विचार करतांना आपण विधवांना विसरतो, पण माळेवाडीमधील संजयनगरमधील महिलांनी वेगळीच संकल्पना राबवली. विधवांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सन्मानानं सहभागी केलं. या हळदीकुंकूत राजमाता जिजाबाई, कांतीजोती सावित्रीबी फुले यांच्यावरील पुस्तके वाण म्हणून दिली. याचे आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा सौ सीमाताई एकतपुरे यांनी समता परिषदेच्या माध्यमातून केले.
हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये सवाष्ण महिलांचा सहभाग दिसतो. यातून परितक्त्या,एकल महिला बाहेर राहतात. याला फाटा देत माळशिरस तालुक्यातील माळेवाडी संजयनगरमध्ये राहणाऱ्या विधवा महिलांना एकत्रित करून सीमाताई एकतपुरे यांनी तिळगुळ व वान म्हणून सावित्रीबाई फुले चरित्र पुस्तक भेट दिले. pic.twitter.com/0H9s5kZqcc
— Prof. Hari Narke (@harinarke) January 16, 2022
हळदी- कुंकू कार्यक्रम हे महिलांसाठी खास आकर्षणाचा विषय
- या कार्यक्रमांपासून विधवा महिलांना काही कारण नसताना दूर ठेवले जाते.
- माळेवाडीच्या महिलांनी ती प्रथा मोडली. त्यांनी गावातील पतीचे निधन झालेल्या महिलांनाही सहभागी केले.
- हळदी-कुंकू करायचे म्हटले की, सगळ्यात आधी विचार होतो तो, यंदा संक्रांतीमध्ये काय वाण द्यायचं?
- वाणाची वस्तू कशी युनिक आणि हटके असावी याशिवाय सगळ्यांना तिचा फायदा व्हावा, अशी प्रत्येकीची अपेक्षा असते.
- त्यानुसार विचार करून पुस्तके हेच वाण म्हणून देण्याचे नक्की करण्यात आले.
- ज्ञानज्योती सावित्रीमाई यांचे हरी नरके सर यांनी लिहिलेले चरित्र आणि राजमाता जिजाऊंवरील दुसरे एक पुस्तक अशा पुस्तकांचा वाणात समावेश करण्यात आला.
राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्ष जयाताई एकतपुरे यांच्या नेतृत्वाखालील कार्यक्रमास थोरात ताई, सुरेखा एकतपुरे, भाग्यश्री एकतपुरे यावेळी विधवा महिला सगुणा साठे, राष्ट्रवादी महिला कार्यकारी सदस्य जनाबाई काळे ताई, शालन गायकवाड ताई, सुमन दुधभाते ताई, जयश्री ऐवळे ताई इत्यादी महिला उपस्थित होत्या. सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर मनमुराद आनंद फुलला होता.
सदर उपक्रम हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगनराव भुजबळ, राज्य महिला आयोग अध्यक्षा, प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर आणि अनिल नळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.