मुक्तपीठ टीम
मध्य प्रदेशातील बुंदेलखंड प्रदेशातील पन्ना हा जिल्हा हिऱ्यांच्या खाणींसाठी ओळखला जातो. मध्य प्रदेशातील पन्ना वनक्षेत्र मौल्यवान दगडांच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. येथे जंगलात लाकूड वेचण्यासाठी गेलेल्या एका गरीब महिलेला ४.३९ कॅरेटचा हिरा सापडला. अंदाजे या हिऱ्याची किंमत २० लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.
हिरा निरीक्षक अधिकारी अनुपम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पुरुषोत्तमपूर येथील रहिवासी गेंदाबाई लाकूड गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या, परंतु त्यांना एक मौल्यवान हिरा सापडला. या, महिलेने नंतर डायमंड ऑफिस गाठले आणि ४.३९ कॅरेटचा हा हिरा जमा केला.”
हिरा सापडला त्या गेंदाबाई म्हणाल्या की, “त्या जंगलातून लाकूड गोळा करून ते विकतात आणि घर चालवण्यासाठी मजुरीचे कामही करतात. त्यांना चार मुलगे आणि दोन मुली असून त्या लग्नाच्या वयाच्या आहेत. लिलावातून मिळालेली रक्कम घर बांधण्यासाठी आणि मुलींच्या लग्नासाठी वापरणार असे त्यांनी सांगितले. ”
या अधिकाऱ्याने सांगितले की, या हिऱ्याचा लिलाव केला जाईल आणि त्यातून मिळणारी रक्कम सरकारी रॉयल्टी आणि कर कापून महिलेला दिली जाईल.