मुक्तपीठ टीम
जर्मनीत सशस्त्र उठावाची योजना आखल्याचा संशय असलेल्या अतिउजव्या अतिरेक्यांच्या विरोधात हजारो पोलीस अधिकाऱ्यांनी जर्मनीच्या बहुतांश भागात छापे टाकले. या अतिरेक्यांना सरकार उलथून टाकायचे होते. या छाप्यात पोलिसांनी राईशबर्गर या अतिरेकी गटाशी संबंधित २५ जणांना अटकही केली आहे. हे लोक बळाच्या माध्यमातून देशातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे.
या संशयित अतिरेक्यांवर कारवाई करताना, ३ हजार अधिकाऱ्यांनी देशातील १६ पैकी ११ राज्यांमधील १३० ठिकाणी शोध घेतला. या कारवाईत २२ जर्मन नागरिक आणि एका रशियनसह ३ जणांना दहशतवादी गटात सदस्यत्व असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली.
जर्मन सरकार पूर्ण ताकदीने करणार कारवाई!
- राईशबर्गर गटाचे सदस्य जर्मनीला कायदेशीर राज्य मानत नाहीत.
- यातील काही लोक जर्मन साम्राज्याच्या राजेशाहीला भुललेले आहेत तर, काही लोक नाझी विचारसरणीने प्रेरित आहेत.
- यापैकी काही लोकांचा असा विश्वास आहे की जर्मनी अजूनही सैन्याच्या ताब्यात आहे.
- तसेच या प्रकरणात रशियाच्या सहभागाचा प्रश्नच उद्भवत नाही. याप्रकरणी कायद्यानुसार पूर्ण ताकदीनिशी कारवाई केली जाईल, असेही जर्मन सरकारने म्हटले आहे.
सरकारचे प्रवक्ते स्टीफन हेबस्ट्रेट यांनी माहिती दिली की, “आम्ही सध्या एका गटाबद्दल बोलत आहोत ज्याने जर्मन संसदेच्या इमारतीवर सशस्त्र हल्ला केला आणि देशाच्या लोकशाही राज्य कायद्याला धक्का देण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी कटाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्यांमध्ये ७२ वर्षीय निवृत्त लष्करी कमांडर आणि उजव्या पक्षाच्या माजी खासदाराचाही समावेश आहे.”
जर्मनीच्या सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, “अतिउजव्या अतिरेकी गटाला हिंसक बंडाच्या विचारसरणीने प्रेरणा मिळाली आहे. त्यांचे अनुयायी जर्मनीतील युद्धोत्तर संविधान नाकारत आहेत आणि देशभरात निवडून आलेले सरकार उलथून टाकण्याची मागणी करत आहेत.”